Full Width(True/False)

'रिस्क घेतोय.. तुम्ही पाठिशी उभे रहा', अभिनेत्याने मागितली साथ

मुंबई- करोना व्हायरस आला आणि त्याने प्रत्येकाच्या आयुष्याची गणितं बदलून टाकली. सिनेसृष्टीही यातून वाचली नाही. लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकीकडे सर्व गोष्टी सुरळीत होत असताना चित्रपटगृहांमध्ये मात्र फारसे सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. पण आता २०२१ पासून हे चित्र बदलताना दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेमांच्या निर्मात्यांप्रमाणेच मराठी सिनेमांच्या निर्मात्यांनी चित्रपटगृहात सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. आहे. प्रीतम हा त्यातलाच एक सिनेमा. प्रीतम सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय, त्यासाठी करावी लागणारी तयारी या सर्व गोष्टींवर सिनेमाचा नायक अभिनेता याने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. प्रणवच्या मनात आपल्या दिसण्याबद्दल न्युनगंड असायचा. आपण काही हिरोसारखे दिसत नाही असंच त्याला वाटायचं पण नेमकी हीच गोष्ट त्याच्या बाजूने होईल आणि सिनेमाचा मुख्य हिरो म्हणून त्याला विचारण्यात येईल असा विचार त्याने कधीच केला नव्हता. 'प्रीतम' या आगामी सिनेमात तो मुख्य हिरो म्हणून ६० एमएमच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या आयुष्यातलं हे एक स्वप्न कळत- नकळतपणे या सिनेमामुळे पूर्ण झालं. याबद्दल बोलताना प्रणव म्हणाला की, 'कधी हिरो होईन असा विचारच केला नव्हता. आजूबाजूची मंडळी पाहून मला नेहमीच असा प्रश्न पडायचा. पण या सिनेमाची कथाच वेगळी आहे.' 'सिनेमासाठी असा मुलगा शोधला जात होता जो हिरोसारखा दिसणारा नको. याआधी कधी लव्ह स्टोरी केली नव्हती. एक संपूर्ण लव्ह स्टोरीचा सिनेमा करण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे हे आपल्याला कितपत जमेल याची मनात भीतीही होतीच. पण मी जसा आहे तसा समोर गेलो आणि गोष्टी होत गेल्या. आता ती लव्ह स्टोरीची भीती गेली. मला नेहमीच विनोद आणि गंभीर भूमिकांपेक्षा लव्ह स्टोरीवाल्या भूमिकांचं दडपण यायचं. पण आता ही गोष्टही करून पाहिली तर याचं दडपणही गेलं.' करोना काळात सिनेमा प्रदर्शनाच्या निर्णयाचा प्रश्न विचारला असता प्रणव म्हणाला की, 'मला वाटतं आता सिनेमांचीच नाही तर प्रत्येक गोष्टीची व्याख्या बदलली आहे. आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. किमान पुढचे काही महिने तरी तसेच जातील. पण म्हणून जगणं तर सोडू शकत नाही. त्याचप्रमाणे सिनेमा हाही त्यातलाच एक भाग आहे. या काळात सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करणं आम्हाला योग्य निर्णय वाटतो. पुढच्या काही महिन्यांनंतर अनेक हिंदी सिनेमे भराभर प्रदर्शित होणार. त्या गर्दीत मराठी सिनेमांना किती वेळ मिळणार हा प्रश्न आहेच.' 'रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही या कठीण काळात सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची रिस्क घेतली आहे. त्यांनीही चित्रपटगृहाज जाऊन सिनेमा पाहून आमच्या पाठिशी ठामपणे उभं रहावं एवढीच अपेक्षा आहे. कारण या सिनेमाला यश मिळालं तर पुढे येऊ घातलेल्या मराठी सिनेमांना बळ मिळेल.' दरम्यान, कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. प्रणव आणि नक्षत्रासोबतच उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आबा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. अॅड फिल्म मेकर सिजो रॉकी दिग्दर्शित 'प्रीतम' सिनेमा येत्या १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NLKaf4