Full Width(True/False)

'या' स्थानिक कलाकारांना मिळालं मोठं व्यासपीठ;मालिकेमुळं पालटलं नशीब

कलागुणांसाठी उत्तम व्यासपीठमाझ्या कुटुंबातील कोणीही कलाक्षेत्रामध्ये नाही. पण मला अभिनयाची आवड होती आणि कुटुंबाचाही पाठिंबा होता. त्यामुळे साताऱ्यात राहूनच अभ्यास सांभाळून ऑडिशन्स देत होते. अशातच मालिकेसाठी ऑडिशन दिली. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मला प्रचंड दडपण आलं होतं. पण सेटवरील अनुभवी कलाकारांनीसुद्धा मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य समजून सांभाळून घेतलं. सध्या मालिकांचं चित्रीकरण हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात होत असल्यामुळे अनेक स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. पण मार्गदर्शना अभावी अनेक कलाकार या क्षेत्रापासून दूर आहेत. अशा नवख्या कलाकारांना मार्गदर्शन करायला मला नक्कीच आवडेल. - श्वेता खरात, मोना, राजा-राणीची गं जोडी प्रोत्साहनामुळे मिळालं बळमाझ्या चेहऱ्यावरील हावभावामुळे मला मित्र मंडळी अभिनय क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. यामुळे मी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यातील नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करायला सुरुवात केली. मी लॉकडाउनच्या आधी नोकरी करत होतो. पण करोना काळात माझी नोकरी गेली तेव्हा पुन्हा स्वतःला या क्षेत्रात झोकून द्यायचं ठरवलं. एका ग्रुपमध्ये मालिकेसाठी सुरू असलेल्या ऑडिशनबाबत कळलं. त्यानुसार व्हिडीओ पाठवला आणि निवड झाली. बड्या कलाकारांसोबत काम करण्याची पहिलीच वेळ असली तरीही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. नवनवीन गोष्टी शिकून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल. - स्वप्निल पवार, दीपक, मुलगी झाली हो पुन्हा वळले अभिनयाकडेमी कॉलेजमध्ये असताना एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हापासूनच अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात झाली. मी मूळची नाशिकची असल्यामुळे तिथूनच ऑडिशन्स देत होते. मी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. पण 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेने मला वेगळी ओळख मिळवून दिली. माझं पडद्यावरील वय जास्त दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे लतिकाची आई साकारण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागली. त्यात लग्नानंतर साधारण १५ वर्षं मी नोकरी करत असल्यामुळे या क्षेत्रापासून दूर होते. पण पुन्हा या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. आमच्या सेटवरची बरीचशी मंडळी नाशिकची आहेत, त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. - पूनम पाटील, जयश्री, सुंदरा मनामध्ये भरली कमी वयात अभिनयाचे धडेमाझा आणि अभिनयाचा संबंध हा नृत्याच्या आवडीमुळे आला. अभ्यास सांभाळत नृत्याचं प्रशिक्षण घेणं सुरूच होतं. लॉकडाउनमध्ये सातारच्याच एका कुटुंबाकडून मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळलं. मी आई-बाबांच्या पाठिंब्यामुळे ऑनलाइन ऑडिशन दिली. नंतर काही दिवसातच टीमकडून होकार आला. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. हळूहळू कॅमेऱ्याची सवय व्हायला लागली आहे. टोन्या लोकांना आवडू लागलाय. मी सेटवर सगळ्यात लहान असल्यामुळे प्रत्येक जण माझी खूप काळजी घेतो. मी जेव्हा घरी जातो तेव्हा लोक मला भेटायला येतात, विचारपूस करतात. तेव्हा खूप छान वाटतं. - विरल माने, टोन्या, देवमाणूस कुटुंबाचा पाठिंबामाझ्या एका मैत्रिणीकडून मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळलं. लूक टेस्ट झाल्यावर रेणुकामाता या भूमिकेसाठी माझी निवड झाली. पौराणिक पात्र साकारण्याची मनापासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. अवघ्या दोन महिन्यांतच लोक मला ओळखू लागले, हे या मालिकेमुळे शक्य झालं. अभिनया सोबतच मी भरतनाट्यम आणि कथक विशारद आहे. मी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांनीच मला अभिनय क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या सगळ्यात कुटुंबाचा पाठिंबा मिळाला. प्रत्येक वेळी संधीच्या शोधात मुंबईला जाणं शक्य नसतं. त्यामुळे स्थानिक कलाकारांना संधी देण्याचं प्रशंसनीय काम निर्मिती संस्थेने केलं आहे. - भाग्यश्री कालेकर, रेणुका माता, ज्योतिबा स्वप्न झालं पूर्णस्वप्नातही वाटलं नव्हतं की, मला इतकं मोठं व्यासपीठ मिळू शकेल. कारण आमच्या इथे अभिनयाच्या संधी फार कमी आहेत. जेव्हा या मालिकेच्या दिग्दर्शकाची सहज भेट झाली तेव्हा मी अभिनयाच्या आवडीबद्दल त्यांना सांगितलं. 'ऑडिशन दे आणि जर एखादा पात्र असेल तर तुला कळवू', असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर साठे या भूमिकेसाठी माझी निवड झाली. सुरुवातीला इतकी मोठी टीम आणि दिग्गज कलाकार हे पाहून दडपण आलं. पण सेटवरच्या सगळ्यांनी लगेच आपलंसं केलं. मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आता या क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा आहे. - दीपक साठे, साठे, कारभारी लयभरी संकलन- सिद्धेश सावंत


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3apFkwO