मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. दिवंगत अभिनेत्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेखर सुमन त्याच्या कुटुंबीयांना नेहमीच पाठिंबा देताना दिसले होते. पण नुकतीच शेखर सुमन यांच्यासोबत अशी एक घटना घडली की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. शेखर सुमन यांनी नुकतीच एका न्यूज चॅनेलवर त्यांचा धाकटा मुलगा अध्ययन सुमनच्या आत्महत्येची बातमी पाहिली आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. पण जेव्हा यामागचं सत्य समोर आलं तेव्हा मात्र त्यांना राग अनावर झाला. एका टीव्ही चॅनेलवर शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलावर आधारित कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात त्यांच्या धाकट्या मुलाच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली. हे ऐकल्यावर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. जेव्हा त्यांनी दिल्लीत असणाऱ्या अध्ययनला कॉल करून त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा संपर्क होऊ शकला नाही. ज्यामुळे अध्ययनच्या आईलाही रडू कोसळलं. काही वेळानं अध्ययननं कुटुंबीयांशी संपर्क केला तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. पण शेखर सुमन यांना मात्र त्या चॅनेलन अशाप्रकारे खोटी बातमी दाखवलेली पाहून राग अनावर झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहून राग व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं, 'एका न्यूज चॅनेलवर आम्ही अध्यनच्या आत्महत्येची बातमी पाहिली. ज्यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांनाच खूप त्रास झाला. या न्यूज चॅनेलनं दावा केला होता की, अध्यननं आत्महत्या केली आहे. त्यावेळी अध्ययन दिल्लीत होता. न्यूज पाहिल्यावर आम्ही लगेचच अध्ययनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा फोनवर संपर्क होऊ शकला नाही. ज्यामुळे एका क्षणात आम्हाला सर्वांना हजार वेळा मेल्याची जाणीव झाली. या बातमीनं आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप त्रास झाला आहे.' शेखर सुमन यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'अशा निंदनीय कृत्यासाठी मी त्या चॅनेलवर कायदेशीर कारवाई करणार आहे. मीडियानं जबाबदारीनं वागायला हवं. अशाप्रकारे एखाद्याविषयी अफवा पसरवणं अतिशय चुकीचं आहे. मी सर्वांना विनंती करतो की सोशल मीडियावरून या चॅनेलला बंद करण्याची मागणी करावी.' याशिवाय या ट्वीटमध्ये त्यांनी या चॅनेलकडे सार्वजनिक स्थरावर माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या चॅनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sdD5mk