मुंबई: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खाननं काळवीट शिकार केसमध्ये खोटं शपथपत्र जमा केल्याबद्दल माफी मागितली आहे. सलमाननं २००३ मध्ये जोधपूर सत्र न्यायालयात एक शपथपत्र जमा केलं होतं. जे नंतर खोटं असल्याचं समोर आलं होतं. १९९८ मध्ये काळवीटाची अवैध शिकार केल्याप्रकरणी सलमान खानवर केस दाखल करण्यात आली होती. या सुनावणीच्या दरम्यान १८ वर्षांपूर्वी सलमाननं हे शपथपत्र जमा केलं होतं. आता ही केस शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून ११ फेब्रुवारी रोजी याची अंतिम सुनावणी होणार आहे. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमाननं काळवीटाची शिकार केली होती. सलमाननं काळवीट शिकार केसप्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोधपूर सत्र न्यायालयात हजेरी लावली होती. '८ ऑगस्ट २००३ रोजी सलमानकडून चुकून खोटं शपथपत्र जमा करण्यात आलं होतं. यासाठी त्याला माफी मिळावी' अशी विनंती सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी न्यायालयाला केली आहे. सुनावणीच्या वेळी सारस्वत म्हणाले, '८ ऑगस्ट २००३ रोजी सलमाननं चुकून ते शपथपत्र दिलं होतं. कारण बीझी शेड्यूलमुळे सलमान हे विसरून गेला होता की त्याचा शस्त्र परवाना रि-न्यू करण्यासाठी देण्यात आला आहे. ज्यामुळे त्याने न्यायालयाला त्याचा शस्त्र परवाना हरवल्याचं शपथपत्र दिलं होतं.' सलमान खानला १९९८ मध्ये जोधपूर जवळच्या एका गावात दोन काळवीटांची अवैध शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सत्र न्यायालयात केस दाखल करण्यात आली आणि त्याला त्याचा शस्त्र परवाना न्यायालात जमा करण्यास सांगण्यात आलं होतं. पण सलमाननं त्यावेळी एक शपथपत्र न्यायालयात सादर केलं होतं. ज्यात त्यानं त्याचा शस्त्र परवाना गहाळ झाल्याचं म्हटलं होतं. तसेच त्याची एफआरआय आपण वांद्रे पोलिस ठाण्यात दिली असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण त्यानंतर झालेल्या तपासात सलमानचा शस्त्र परवाना हरवलेला नाही तर तो रि-न्यू करण्यासाठी देण्यात आला असल्याचं समोर आलं. यानंतर पब्लिक प्रोस्क्यूटर भवानी सिंह भाटी यांनी सलमानवर न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकारणी केस दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a6RA57