मुंबई: सेलिब्रेटी आणि चाहते यांचं एक वेगळं नातं नेहमीच पाहायला मिळतं. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीसाठी हे चाहते काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणं बॉलिवूड आणि साउथ सिनेसृष्टीत आहेत. पण आता एका अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या नावानं चक्क मंदिर बांधलं आहे. ज्यामुळे ती अभिनेत्री स्वतः सुद्धा खूप चकित झाली आहे. असं या अभिनेत्रीचं नाव आहे. निधी अग्रवाल ही साऊथ सिनेसृष्टीतली अभिनेत्री आता अशा सेलिब्रेटींच्या यादीत जाऊन बसली आहे. ज्यांच्या नावानं त्यांच्या चाहत्यांनी चक्क मंदिरं बांधली आहेत. सध्या निधी अग्रवाल चाहत्यांनी तिच्या नावानं बांधलेल्या मंदिरामुळे खूप चर्चेत आली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं निधीच्या चाहत्यांनी तिला हे स्पेशल गिफ्ट दिलं आहे आणि विशेष म्हणजे निधीला ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून समजली. सोशल मीडियावरील फोटो आणि चाहत्यांचे मेसेज पाहिल्यावर स्वतः निधी सुद्धआ हैराण झाली. निधी अग्रवालचं हे मंदिर चेन्नईमध्ये बांधण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या ठिकाणी तिच्या मूर्तीला दुधाचा अभिषेकही केला जातो. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना निधी म्हणाली, हे माझ्यासाठी चाहत्यांकडून व्हॅलेंटाइन गिफ्ट होतं. जेव्हा मी फोटो पाहिले आणि मेसेज वाचले तेव्हा मी सुद्धा चकित झाले होते. मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता. पण त्यांच्या या प्रेमासाठी मी त्यांची आभारी आहे. मी खूप आनंदी आहे. निधी अग्रवालनं सांगितलं की, तिला या मंदिराच्या लोकेशनबाबत फारशी काही माहिती नाही. पण एवढं नक्की माहीत आहे की, हे मंदिर चेन्नईमध्ये आहे. साउथ सिनेसृष्टीत सेलिब्रेटीचं मंदिर बांधलं जाणं ही काही नवी गोष्ट नाही. याआधीही अनेक सेलिब्रेटींच्या नावाची मंदिरं या ठिकाणी बांधली गेली आहेत. ज्यात एमजीआर, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा यांचा समावेश आहे. चाहत्यांनी बांधलेल्या या मंदिराविषयी बोलताना निधी सांगते, 'मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे. मी तमिळ मध्ये फक्त दोन चित्रपट केले आहेत आणि काही चित्रपट तेलुगूमध्ये आहेत. आताही मी या दोनच भाषेतील काही चित्रपटांचं शूटिंग करत आहे. त्यामुळे माझ्यासाठी चाहत्यांनी असं करणं खूपच शॉकिंग होतं. पण मी त्यांची आभारी आहे. मला अजिबात या गोष्टीची कल्पना नव्हती की माझे चाहते माझ्यासाठी असं काहीतरी करतील.' वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर निधी लवकरच पवन कल्याणसोबत एका तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. २०१७ मध्ये निधीनं 'मुन्ना माइकल' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये तिचे काही चित्रपट रिलीज झाले. ज्यात 'सव्यसाची', 'मिस्टर मजनू', 'आईस्मार्ट शंकर' या चित्रपटांचा समावेश आहे. तर २०२१मध्ये तिचे 'भूमि' आणि 'पूनगोडी' हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rYvxny