मुंबई: मागच्या काही दिवसांपासून भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालच्या बायोपिकची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अभिनेत्री परिणिती चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या 'सायना' बायोपिकचा ट्रेलर महिला दिनी रिलीज झाला. ज्यात सायना नेहवालच्या बालपणापासून ते ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात तिच्या आईपासून होते. या चित्रपटात सायना नेहवालच्या आईची भूमिका अभिनेत्री मेघना मलिक यांनी साकारली आहे. त्या अस्सल हरियाणवी उच्चारात लहानग्या सायनाला बॅडमिंटनपटू होण्याची स्वप्न दाखवत डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यानंतर सुरू होतो, सायनाचा बॅडमिंटन स्टार होण्याचा प्रवास आणि संघर्ष. अनेक दृश्यामध्ये तिच्या नेहमीच्या बोलक्या अंदाजात नाही तर एकदम साध्या भोळ्या मुलीसारखी दिसत आहे. सायना नेहवालचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची भूमिका मानव कौल यांनी साकारली आहे आणि नेहमीप्रमाणेच त्यांचा अभिनय उत्तम आहे. 'सायना' बायोपिकचं दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केलं आहे. या चित्रपटाला अमाल मलिक यांनी संगीत दिलं आहे. अमाल यांनी याआधी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटासाठीही संगीत दिलं होतं. टी सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार, सुजय जयराज आणि रासेश शाह यांनी सायना बायोपिकची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २६ मार्चला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kW1Dhk