मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार २०२१ची घोषणा झाली आहे. अभिनेता मनोज बाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मनोजला त्याच्या '' चित्रपटातील अभिनयासाठी मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर राष्ट्रीय पुरस्कारांबाबत अनेक नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र हे एकमेव असं नाव आहे ज्याच्यावर कोणाला आक्षेप नाही. 'भोसले'मध्ये महाराष्ट्रातल्या एका निवृत पोलीस हवालदाराची व्यक्तिरेखा मनोजनं साकारली होती. सध्या मनोज बाजपेयी करोना संक्रमित असून घरीच त्यावर उपचार घेत आहे. पण चकित करणारी गोष्ट अशी की, जेव्हा पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी मनोज गाढ झोपेत होता. आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे त्याला माहीत सुद्धा नव्हतं. 'स्पॉटबॉय'नं दिलेल्या वृत्तानुसार २२ मार्चला संध्याकाळी जेव्हा ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी करोनाग्रस्त असलेला मनोज बाजपेयी घरी झोपलेला होता. करोनानं त्याला खूपच कमजोर केलं आहे. 'स्पॉटबॉय'शी बोलताना मनोज म्हणाला, 'मी गाढ झोपेत होतो. माझा फोन वाजत होता त्यामुळे झोप मोडली. मला अजिबात कल्पना नव्हती की, असं काही होऊ शकतं. या करोनानं मला खूप कमजोर आणि आळशी केलं आहे. अशात योग्य वेळी मला मिळालेली ही आनंदाची बातमी होती.' मनोज बाजपेयीनं या पुरस्कारानंतर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. हा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि इतर कलाकार यांचाही आहे. ज्यांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. ज्यांनी माझ्यावर या भूमिकेसाठी विश्वास ठेवला त्या सर्वांचे खूप आभार.' राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची मनोज बाजपेयीची ही तिसरी वेळ आहे. या आधी त्याला 'सत्या' आणि 'पिंजर' या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'भोसले' ही महाराष्ट्रातल्या एका निवृत पोलीस हवालदाराची कथा आहे. मुंबईच्या चाळीत राहणारा हा निवृत्त हवालदार एक प्रवासी बिहारी मुलगी आणि तिचा भाऊ यांना सुरक्षा देतो. प्रवासी लोकांना मिळणाऱ्या धमक्या आणि दिला जाणारा त्रास या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. ज्यात स्थानिकांच्या मनात या लोकांविषयी असणारा द्वेष आणि त्यावरून होणारं राजकारण दाखवण्यात आलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cdq9YE