Full Width(True/False)

दुसऱ्या इनिंगसाठी मालिकाच का स्वीकारली?; वर्षा उसगावकर म्हणतात...

संपदा जोशी ० अनेक वर्षांनी मराठी मालिका करण्याचा अनुभव कसा आहे?- मराठी मालिका करून जवळपास दहा वर्षं झाले. तेव्हा सुद्धा महेश कोठारे यांच्या मालिकेत काम केलं होतं आणि आता सुद्धा त्यांची निर्मिती असलेल्या मालिकेतच काम करतेय. नंदिनी हे पात्र माझ्या प्रतिमेला छेद देणारं आहे. पारंपरिक पेहराव, कोल्हापूरी भाषा हे सगळं साकारताना एक आव्हान होतं. मालिका सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी आजही या सगळ्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. ० मालिकेत कोल्हापूरी भाषा बोलण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली?- संहिता मिळाली की ती वाचायची आणि शॉटसाठी तयार व्हायचं. भाषेचा लहेजा पकडताना निश्चितच काळजी घ्यावी लागते. काही शब्द अंगवळणी पडले आहेत. या भाषेत तरबेज असलेला तेजस सेटवर भाषा अभ्यासासाठी आम्हाला मदत करतो. त्यामुळे बरंचसं काम सोपं होतं. ० मुख्य नायिका ते मालिकेतली सासू हा प्रवास कसा होता?- याआधीही मी सासूची भूमिका साकारली होती. आता या मालिकेतही मी तीच भूमिका करतेय. ही व्यक्तिरेखा फार महत्त्वाची आहे. मी याआधी जरी नायिकेच्या भूमिका साकारल्या असल्या तरीही आता या घडीला मला माझ्या वयानुसारच भूमिका शोभतील आणि करायलाही आवडतील. ० नृत्यासाठी कसा वेळ काढता?- नृत्य काहीसं मागे पडलं आहे. मागे वळून बघताना, 'हे खरंच आपण केलंय का' असंही वाटतं. मध्यंतरी मी कथक आणि मॉडर्न डान्सचं प्रशिक्षण सुरू केलं होतं पण आता तेही मागे पडलं आहे. रोजच्या जीवनात नृत्याचा सराव होत नाही. पण पुरस्कार सोहळे तसंच काही वेळा मालिकेत नृत्याशी संबंध येतो. 'सदाबहार वर्षा' या कार्यक्रमात मी नृत्य सादरीकरण केलं होतं. त्यामुळे नृत्याशी पूर्णपणे संबंध तुटलेला नाही. ० खऱ्या आयुष्यात आणि तुमच्या पात्रात काय साम्य आहे?- मी खूप स्वाभिमानी आहे. मालिकेतलं पात्रही असंच आहे. या स्वाभिमानाचा मनोरंजनसृष्टीत आणि एरवीच्या आयुष्यात कधीकधी त्रासही होतो. मला विशिष्ट व्यक्तिरेखा द्या असं मी कोणाला सांगायला जात नाही. माझ्या मेहनतीवर मला ते मिळायला हवं. तसंच स्वतःच्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणं, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं हे देखील माझ्यात आणि मालिकेतल्या व्यक्तिरेखेतलं साम्य आहे. ० सध्याच्या मालिकांबद्दल काय वाटतं?- मालिकांचे विषय चांगले आहेत. सामाजिक विषयांचे दाखवले जाणारे आशय मला आवडताहेत. प्रत्येक मालिकेतून काहीतरी संदेश मिळतोय. पण टीआरपीच्या गणितामुळे मालिकेत नेहमी तर्कशुद्ध दाखवलं जाईलच असं नाही. काही गोष्टी न पटणाऱ्याही दाखवल्या जातात. पण शेवटी मालिका आहे. तिथे काही प्रमाणात न पटणाऱ्या गोष्टीही दाखवाव्या, कराव्या लागतात आणि टीआरपीच्या कलेनं घ्यावं लागतं. ० कलाकार त्यांची दुसरी इनिंग सुरू करताना शक्यतो चित्रपटाची निवड करतात. तुम्ही मात्र मालिका स्वीकारली; यामागे काही विशेष कारण?- मालिका करायचं असं काही ठरवलं नव्हतं. चित्रपट देखील करायचे आहेत. भूमिका ताकदीची, कणा असलेली हवी. मी स्वाभिमानी आणि भूमिकांविषयी चोखंदळ असल्यानंच कमी चित्रपट केले. लवकरच माझा एक चित्रपट प्रदर्शित होईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kLixPL