मुंबई- करोनाने देशभरात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अनेकांना विनाकारण आपल्या प्राणाला मुकावं लागत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते यांनीही त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेते यांचं नुकतंच करोनाने निधन झालं आहे. आपल्या निर्व्यसनी आणि उत्तम प्रकृती असणाऱ्या जिवलग मित्राच्या जाण्याने प्रवीण यांना धक्का बसला आहे. १५ दिवसांपूर्वी अमोल यांना करोनाची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण आणि अमोल खूप जवळचे मित्र असल्याने त्यांचं नातं शब्दांपलीकडे होतं. आपल्या लाडक्या मित्रासाठी प्रवीण यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरून प्रवीण यांना त्यांच्या मित्राच्या जाण्याचं किती दुःख झालं आहे याची जाणीव होते. त्यांनी लिहिलं, 'माझा मित्र अमोल धावडे गेला. करोनाने आज एक निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट, जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला. किती आठवणी..? १९९६ साली मी लिहिलेल्या 'आणखी एक पुणेकर' या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हंटला होता म्हणुन माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच.. 'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न' आणि आता 'सरसेनापती हंबीरराव' प्रत्येक सिनेमात अमोल आहेच. आपल्या मित्राबद्दल सांगताना प्रवीण यांनी लिहिलं, '११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्तापर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅागने सुरू करायचो. हा माझा एक श्रद्धेचा भाग होता. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला व्हायचा. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा. एकत्र नॅशनल खेळलो, एकांकीका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास. तुझा शेवटचा मेसेज होता 'बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव' राहिलाच शेवटी. डोळ्यातील पाणी थांबत नाहीये रे आमल्या. जिथे कुठे असशील सुखी राहा. नाही तरी मी आणि पिट्या तुला 'सुखी जीव' असच म्हणायचो की. सुखी राहा. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा.' अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gHntF6