Full Width(True/False)

'राजा'माणूस हरपला; ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते यांचं करोनाने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आलं. आज दुपारी १२.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांची बायपास करण्यात आली होती. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नांदलस्कर यांनी आतापर्यंत ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. किशोर नांदलस्कर यांच्या रंगभूमीच्या कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. याप्रमाणेच ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं होतं. यातीलही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्कर यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी आपल्या खास अंदाजात सादर केल्या होत्या. व्यावसायिक रंगभूमीवर किशोर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादी नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ या मराठीतल्या गाजलेल्या सिनेमांप्रमाणेच त्यांनी महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’ ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी सिनेमांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3v5FAIM