Full Width(True/False)

खतरनाक! ‘राधे’च्या पोस्टरवर सलमान खानसोबत झळकले प्रवीण तरडे

मुंबई: सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर आणि नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमाचा ट्रेलर पाहून सलमानचे चाहते आज आनंदी झाले आहेत. सिनेमाचं नवीन पोस्टर देखील प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक हेदेखील दिसत आहेत. हा सिनेमा पुढच्या महिन्यात १३ मे रोजी थिएटरमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने ‘लवकरच येत आहे… तुमचा मोस्ट वाँटेड भाई’ असे लिहिले. हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांना पाहून त्यांच्या चाहत्यांमध्येही सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र या सिनेमात त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाची निर्मिती प्रभूदेवाने केली आहे. या सिनेमात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाची घोषणी २०१९ मध्ये झाली होती आणि तो गेल्यावर्षी ईदला रिलीज होणार होता. मात्र, गेल्यावर्षी झालेला करोनाचा उद्रेक आणि त्यामुळे देशभरात लागलेला लॉकडाउन यामुळे या सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. सध्या देशात करोनाची दुसरी लाट आली असून दिवसागणिक पेशंटची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागू झाला आहे. त्यामुळे थिएटर बंद आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक सिनेमांचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. सलमानचा हा सिनेमा यंदा तरी रिलीज होतो की नाही अशी परिस्थिती होती. परंतु सलमानने हा सिनेमा ईदच्याच मुहूर्तावर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. तसेच थिएटरबरोबरच हा सिनेमा झी फ्लेक्स आणि झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरी हा सिनेमा रिलीज होणार आहे. राधे सिनेमा पाहण्यासाठी काही ठराविक रक्कम प्रेक्षकांना मोजावी लागणार आहे. दरम्यान या सिनेमाचा ट्रेलरही आज रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात होते ती रणदीप हुड्डा आणि मुंबईतील ड्रग्स डिलिंगपासून ज्यामुळे शहरात खूपच गोंधळ माजलेला दाखवण्यात आला आहे. रोज नवा क्राइम घडताना दिसतो आणि या सगळ्याला रोखण्यासाठी होते सलमानची दमदार एण्ट्री. ट्रेलरमध्ये सलमानची एण्ट्री, धमाकेदार डायलॉग आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. सिनेमात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिशा पाटनी एका निरागस मुलीच्या भूमिकेत दिसत आहे जिचं नाव दिया आहे. या चित्रपटात दिशा आणि सलमान 'भारत' नंतर पुन्हा एकादा एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिनेमात रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, प्रवीण तरडे आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tHmIQc