Full Width(True/False)

अजीब दास्‍तान्‍स: गोष्टी छोट्या डोंगराएवढ्या...

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची निर्मिती संस्था आहे. या संस्थेच्या डिजिटल विंगनं ‘’ यातल्या लघुपटांची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या वेगवेगळ्या कथांचा (लघुपट) हा एकत्रित संग्रह आहे. सगळ्याच संहितांचा पूर्ण लांबीचा चित्रपट होईल, याची शाश्वती नसते. काही कथा अशा असतात ज्यांची लांबी छोटी असते; पण त्यातली गोष्ट ही डोंगराएवढी असते. त्यामुळे पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा असा लघुपटांचा एकत्रित चित्रपट करून प्रदर्शित करणं, हा त्यातला उत्तम मार्ग म्हणता येईल. ‘अजीब दास्‍तान्‍स’मध्ये चार कथा आहेत. या कथांच्या पात्रात एक समान धागा आहे, तो म्हणजे ‘आनंद’. सर्व पात्रांच्या संघर्षाचा शोध हा आनंद आहे. यातल्या ‘मजनू’ या कथेचं दिग्दर्शन शशांक खेतानचं आहे. ‘खिलौना’ कथेचं दिग्दर्शन ‘गुड न्यूज’ फेम राज मेहतानं केलंय. ‘अनकही’चं दिग्दर्शन कायोज ईराणी यानं केलं आहे आणि चौथ्या कथेचं नीरज घेवान यानं केलं आहे. संघर्षमय वाटेवर चालत असताना एक-एक पायरी या कथामंधली पात्र सर करतात. विशेष म्हणजे, या सगळ्या कथांमधली पात्रं आणि प्रसंग मोठ्या हिमतीनं त्यांच्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांना बगल देतात; पण नंतर ती परंपरांच्या विळख्यात अडकतात. त्यांना या कैदेतून बाहेर पडायचं आहे; परंतु अपराधीपणाची भावना त्यांना ‘आनंदी’ होऊ देत नाही. हेच या कथांचं मर्म या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. या सगळ्यात चूक कोण आणि बरोबर कोण, हे ठरवण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी प्रेक्षकांवर सोडला आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुसार ‘मजनू’ची लिपाक्षी, राजकुमार आणि बबलू भैय्या असोत किंवा ‘खिलौना’ची बिन्नी, सुशील आणि मीनल... ही सगळी पात्र त्या-त्या क्षणी आपल्याला अचूक वाटतात; पण त्यांची ‘कृत्यं’ ही नैतिक-अनैतिकतेच्या तराजूत मोजली जातात. यात उच्च-नीच, भेदभाव, कपट, राजकारण, भावभावना, महत्त्वाकांक्षा, सुख-दुःख, आत्मियता, ईर्षा, क्रोध आदींपासून ते समाजानं आखून दिलेल्या चौकटीला भेद देणारी ‘गोष्ट’ या चित्रपटात सामावलेली आहे. जी आपल्याला ‘मानवी प्रवृत्ती’ ही संकल्पना उलगडून दाखवू पाहते. चारही लेखक आणि दिग्दर्शकांनी आपली गोष्ट सक्षमपणे मांडली आहे. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी जमून आल्या आहेत. फातिमा सना शेख, नुसरत भरुचा, अदिती राव हैदरी या नव्या फळीतल्या अभिनेत्रींनी नेहमीपेक्षा एक पाऊल पुढं टाकत या भूमिका साकारल्या आहेत. शेफाली शहा, कोंकणा सेन-शर्मा यांच्या अभिनयातून त्यांचा अनुभव दिसतो. जयदीप अहलावत, अभिषेक बॅनर्जी, मानव कौल या अभिनेत्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडच्या भाऊगर्दीत स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट जमलाय. संकलन उत्तम. पार्श्वसंगीत आणि गाणी प्रसंगांशी एकरूप होणारी आहेत. कथांची ही मांडणी पाहण्यासारखी आहे. पाहा ट्रेलर: अजीब दास्‍तान्‍स निर्मिती ः करण जोहर, अपूर्व मेहता दिग्दर्शक ः शशांक खेतान, राज मेहता, नीरज घेवान, कायोज ईराणी लेखक : शशांक खेतान, सुमित सक्सेना, नीरज घेवान, उझ्मा खान कलाकार : फातिमा सना शेख, नुसरत भरुचा, अदिती राव हैदरी, शेफाली शहा, कोंकणा सेन-शर्मा, जयदीप अहलावत, अभिषेक बॅनर्जी, मानव कौल संकलन ः नितीन बेड छायांकन ः पुष्कर सिंह, जिष्णू भट्टाचार्जी, सिद्धार्थ दिवान, सिद्धार्थ वासनी दर्जा ः साडेतीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tuDjXq