Full Width(True/False)

त्यांच्या करोना ट्रिटमेंटचं बिल अवघे १० रुपये; फुलवा खामकरने शेअर केला अनुभव

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत चालली आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांच्यासह सर्व वैद्यकीय कर्मचारी अतिशय धीराने आणि संयमाने काम करत आहेत. तिथे असलेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पालिका रुग्णालायातील काम करणा-या डॉक्टरांसह सर्व कर्मचा-यांच्या सर्मपण वृत्तीचा अनुभव यांना आला आहे. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. फुलवा खामकर यांच्या काकांना करोनाची लागण झाली. त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने व्हेंटिलेटर लावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये बेड मिळवणे हे मोठे आव्हान होते. हा सगळा अनुभव फुलवा कसा होता हे सगळे त्यांनी या पोस्टमध्ये मांडले आहे. या पोस्टमधून सरकारी हॉस्पिटल आणि तिथे काम करणा-या डॉक्टरांसह सर्व कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे जाहीरपणे आभार मानले आहेत आणि त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले आहे. फुलवा खामकर यांची पोस्ट फुलवा खामकर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, ' करोना घरापर्यंत आला. आम्हाला गेल्यावर्षी झाला, तेव्हा त्याची झळ पोहोचली नव्हती. ती आता जास्त प्रकर्षाने जाणली, माझा अत्यंत लाडका छोटा काका जेव्हा व्हेंटिलेटवर गेला तेव्हा. आता कोणी ऐकणार नाहीये. करोनाची काय भीती ठेवायची आता? जगण्यासाठी काम तर केलेच पाहिजे ना? बघा कसं सगळं नॉर्मल चाललं आहे बाहेर... हो हो मी पण क्लासेस घेते आहे ना... इथे सगळं ओके आहे असं माझ्या मँचेस्टर येथे राहणा-या बहिणीला बोलणारी मी आणि माझ्यासारखे अनेक... माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे. हवं ते हॉस्पिटल सोडा पण आपल्याला साधा बेड मिळत नाही म्हणजे काय? टीव्हीवर जे सतत सांगत आहेत कीकी ऑक्सिजन बेडसुद्धा उपलब्ध नाहीये म्हणजे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणजे काय हे सत्य खाडकन् थोबाडीत मारल्यासारखं समोर उभं राहिलं आणि अगदी आपल्या घरापर्यंत आलं.' 'पैसे आणि ओळख या घटकांना कोरोना ओळखतच नाही. कोरोनाने कम्युनिस्म म्हणजे साम्यवाद परत आणलाय हेही तितकंच खरं. सर्वांना समान लेखतो आहे. लहान, मोठं, गरीब, श्रीमंत, जात, धर्म त्याच्या खिजगणतीत नाहीये. माणसाला तो फक्त माणूस म्हणून बघतो. आपल्यातील अनेकांना ही पण एक त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट.' काकाला बीएमसी कोविड सेंटरमध्ये बेड मिळाला तेव्हा टाकलेला सुस्कारा मी कधीच विसरणार नाही. त्याला वाचवण्याची शर्थ करत असलेले आपले डॉक्टर... अनेक पेशंटपैकी एक असलेल्या माझ्या काकासाठी झगडणारे आपले सरकारी डॉक्टर्स, बीएमसी आणि आपली महाराष्ट्र सरकारची सिस्टीम यांना आज पुन्हा एकदा मानाचा मुजरा!!!' सरकारी डॉक्टरांवर विश्वास हा अनुभव शेअर करताना फुलवा यांनी त्यांच्या सास-यांना केईएममध्ये अॅडमिट केले होते. सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या मनात पूर्वग्रह असतो परंतु तो कसा चुकीचा आहे याचा अनुभवी फुलवा यांनी या पोस्टमध्ये मांडला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, '.. सास-यांवर केईएममध्ये उपचार सुरू असताना आमच्या मनात त्यांना खासगी हॉस्पिटमध्ये हलवण्याचा विचारही आला. मात्र तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही सगळी शर्थ करतोय आणि आम्ही त्यांचे ऐकले कारण शेवटी त्यांनाच आपल्यापेक्षा जास्त कळतं हे आम्हाला माहिती होतं. आम्ही त्यांच्यावर तेव्हा पूर्ण विश्वास टाकला होता... जो त्यांनी सार्थ केला...' बिल ही नाममात्रच! खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर आणि इतर आजार असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा पैसा उकळला जातो तसा अनुभव सरकारी हॉस्पिटलमध्ये आला नसल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे, त्यावर त्या म्हणाल्या, ' आपल्याला संशय असतो की कोविड सेंटरमध्ये सरकारी डॉक्टर्स आपल्या पेशंटकडे व्यवस्थित बघतील ना... त्यांना काय औषधे देतात ते आपल्याला सांगत नाहीत... कित्येक हजार पेशंटच्या प्रत्येक नातेवाईकांना माहिती देणे डॉक्टरांना कितपत शक्य असते? सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे ते अत्यंत व्यवस्थित ट्रीटमेंट देतात असा अनुभव आम्हाला आला आहे. ४० ते ५० हजाराचे इंजेक्शन बाहेर मिळत नाही इथे काय देणार? माझ्या सास-यांना सर्व मोठी इंजेक्शन दिली गेली आणि ते व्यवस्थित बरे होऊन आले... त्यांच्या संपूर्ण ट्रिटमेंटचे बिल होते अवघे १० रुपये फक्त! आता त्यांनी कोविडची लस घेतली असून गावाला आनंदाने रहात आहेत.. ' डॉक्टरांना सलाम! या पोस्टच्या शेवटी फुलवा यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणा-या प्रत्येक कर्मचा-याचे, प्रशासनाचे आणि सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. त्याचबरोबर सगळ्यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे ही आवाहन केले आहे. करोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन करत त्यांनी सर्वांना घरात सुरक्षित राहण्याचेही आवाहन केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3etpVMS