Full Width(True/False)

युविका चौधरीच्या अडचणी वाढल्या; जातिवाचक वक्तव्य केल्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ९ फेम युविका चौधरीच्या विरोधात एससी/ एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच युविकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात जातिवाचक वक्तव्य करण्यात आलं होतं. तिनं तिच्या या व्हिडीओमध्ये 'भंगी' हा शब्द वापरला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर बरेच वाद झाले. युविकावर बरीच टीका देखील झाली. एवढंच नाही तर युझर्सनी सोशल मीडियावर अरेस्ट हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता. सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतर युविका चौधरीनं हा व्हिडीओ डिलिट केला. तसेच इन्स्टाग्रामवरून माफीही मागितली. तिनं इन्स्टाग्रामवर आपल्याला या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं म्हणत माफी मागितली होती. दरम्यान युविकाच्या अगोदर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्तानंही हाच जातिवाचक शब्द वापरल्यानं तिच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले होते. रिपोर्टनुसार युविका चौधरीच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युविकाच्या विरोधात दलित अधिकार एक्टिविस्ट रजत कलसन यांनी तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीसोबत त्यांनी तिचा हा व्हिडीओही जमा केला आहे. ज्यात युविकानं ते जातिवाचक वक्तव्य केलं आहे. दरम्यान युविकानं तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचं स्पष्टीकरण देत एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, 'मी माझ्या नव्या व्लॉगमध्ये जो शब्द वापरला त्याचा अर्थ मला माहीत नव्हता. कोणाच्याही भावना जाणूनबुजून दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. माझ्याकडून अनावधाननं घडलेल्या चुकीबद्दल मी माफी मागते. तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yO4VK5