मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना मनोरंजन विश्वातील मंडळीही साथ देत आहेत. या सर्व परिस्थितीवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने मटा ऑनलाइनशी बोलताना त्याचे मनोगत व्यक्त केले आहे. देशातील सध्याची जी स्थिती आहे, त्यावर सिद्धार्थ म्हणाला, 'गेल्या वर्षीपेक्षा यंदाची स्थिती अधिक भीषण असून मनोरंजन विश्वावर अवकळा आली आहे. एक प्रकारचे भीतीचे सावट पसरले आहे. मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांचे रोजगार गेले आहेत. सर्वत्र निराशेचे, दुःखद असे वातावरण आहे.' 'गेल्या काही दिवसांत मराठी चित्रपटसृष्टीतील आणि कलाक्षेत्रात अनेक तरुणांचा करोनामुळे निधन झाले. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर असे ज्येष्ठ कलाकारांना आपण करोनामुळे गमावले आहे. हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते.’ अशा या वातावरणात ‘राधे’ सिनेमाबद्दल बोलण्याची इच्छा होत नाही. खरे तर ‘राधे’ हा सिनेमा माझ्या करिअरमधील महत्त्वाचा भाग आहे, परंतु सभोवताली अशी परिस्थिती असताना त्याचा आनंद साजरा करण्याचीच इच्छा नाही.' आम्ही आधी देशाचे नागरिक मग कलाकार सिद्धार्थ पुढे म्हणाला, 'मी कलाकार नंतर परंतु देशाचा, या राज्याचा एक जबाबदार नागरिक आधी आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी आणि माझ्यासारखे मराठी सृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात जशी जमेल तशी मदत करत आहोत. माझ्या मदतीबद्दल मला अजिबात वाच्यता करायची नाही. परंतु जेव्हा हिंदी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी मदत केल्याचे प्रसिद्ध होते. तेव्हा मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल आपसूकच प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा खूप वाईट वाटते.' 'कोल्हापूरात आलेला पूर असो किंवा राज्यात येणारी संकट अशा अनेक वेळेला मराठी कलाकारांनी रस्त्यावर उतरून, गावोगावी जाऊन मदत केली आहे. आमच्यातील अनेकजण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून फक्त करोनाशी संबधित पोस्ट शेअर करत आहोत. कुणाला बेड हवाय तर कुणाला ऑक्सिजन. कुठे काय उपलब्ध आहे याची आमच्याकडे आलेली माहिती देखील आम्ही शेअर करत आहोत. जेणेकरून एखाद्या गरजूला मदत होईल. मी देखील सोशल मीडियाचा वापर करोनाशी संबंधित पोस्टसाठी करत आहे.' मदतीचा गाजावाजा नाही अनेक आपापल्या परीने विविध प्रकारची मदत करत आहे. यामध्ये प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पंडीत यांच्यासारखे अनेक कलाकार आहे विविध पद्धतीने मदत करत आहेत. कुणी रक्तदान करत आहे, कुणी जेवणाची सोय करत आहे. फक्त मराठी कलाकार त्यांनी केलेल्या मदतीचा गाजावाजा करत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेकदा लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते.' अशा शब्दांत सिद्धार्थने खंत व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, 'जे कलाकार लोकांच्या मदतीला जातात आणि त्याचे फोटो शेअर करतात, त्यांच्याबद्दल नक्कीच आदर आहे. परंतु एखादी व्यक्ती जी मदत करते त्याचे मोल करता येऊ शकत नाही. मराठी कलाकारही त्यांना जशी जमेल तशी मदत करतात, म्हणून त्यांच्या मदतीचे मोल कमी होत नाही, हे मराठी कलाकारांवर टीका करणाऱ्यांनी नक्की लक्षात ठेवावे,' असे आवाहनही सिद्धार्थने केले आहे. घरातल्यांसोबत वेळ घालवतोयसध्या करोनाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. त्यामुळे मालिका आणि सिनेमांची चित्रीकरणे बंद झाली आहेत. यामुळे जो मोकळा वेळ मिळाला आहे त्याचा सदुपयोग कसा करतो असा प्रश्न सिद्धार्थला विचारला असता तो म्हणाला, ‘ गेल्यावर्षीपासून आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून आले आहेत. करोनामुळे आपण सर्वचजण घरी आहोत. मध्यंतरी कामाला सुरुवात झाली होती. परंतु या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा सर्व थांबले आहे. हा वेळ मी माझ्या घरच्यांना देत आहे. याशिवाय फिटनेसवर मी जास्त लक्ष देत आहे. वेळ मिळेल तसा क्रिकेटचा सराव करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी लेक स्वरासोबत वेळ घालवत आहे. सुज्ञपणे वागा देशावर जे करोनाचे संकट आले आहे त्याबद्दल सिद्धार्थने खूप पोटतिडकीने त्याचे विचार मांडले आहेत. सिद्धार्थ म्हणाला, ‘जे आपल्यावर संकट आले आहे, त्याची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सर्वांनी खबरदारीने आणि काळजीपूर्वक वागायला हवे आहे. आपल्या काळजीपूर्वक वागण्यामुळे आणि करोनाबाबत सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपले कुटुंबही सुरक्षित राहणार आहे, याचा विचार प्रत्येकाने सातत्याने करायला हवा. आपण सर्वजण सुज्ञ आहोत त्याप्रमाणे कृतीही करायला हवी.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yb90aX