मुंबई: सध्या देश करोनाच्या महासंकटाशी लढत आहे. अशात तौक्ते चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. कोकणासह मुंबईतही या वादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. ठिक-ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. एकीकडे करोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ अशी दोन संकट झेलत असताना 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्री दीपिका सिंहनं मात्र मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या झाडांसमोर फोटोशूट करत हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. दीपिकाच्या अशाप्रकारच्या वागण्यावर नेटकरी भडकले असून त्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच सुनावलं आहे. चक्रीवादळामुळे झालेला मुसळधार पाऊस आणि तुफान वारा यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली होती. अशात अभिनेत्री सिंहनं तिच्या घरासमोरील एका झाडासमोर फोटोशूट करत हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. याशिवाय तिनं एक डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये दीपिकानं लिहिलं, 'तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही. त्यामुळे तसे प्रयत्न करणं थांबवा. स्वत:ला शांत ठेवा. निसर्गावर प्रेम करा आणि त्याचे मूड सहन करायला शिका. वादळ नक्की जाईल. हे झाडं माझ्या घराच्या समोर पडलं. यात कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र या वादळाची आठवण म्हणून मी काही फोटो क्लिक केले.' दीपिकाच्या या पोस्टवर मात्र नेटकरी चांगलेच संतापले आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्यावर टीका केली. एकीकडे या सर्व संकटांमुळे लोक मरत असताना दीपिकाचं हे असं वागणं अतिशय लाजिरवाणं असल्याचं अनेक युझर्सचं म्हणणं आहे. अनेकांनी दीपिकानं पडलेल्या झाडांची आणि या नैसर्गिक संकटाची फोटोशूटसाठी संधी घेतल्याचं म्हणतं तिच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच करोनाच्या काळात अशाप्रकारे मास्क न लावता पावसात भिजत असल्याच्या कारणावरूनही दीपिकाला ट्रोल केलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ftPGNA