Full Width(True/False)

'मालिकेचा दर्जा घसरतोय' असं म्हटलं जातं तेव्हा 'ट्रोलिंगच्या भाषेच्या दर्जाचं काय?

विशिष्ट मालिकांना लक्ष्य करुन त्यावर टीकांचे बाण सोडत सतत खटकणाऱ्या गोष्टींबद्दल बोलण्याचं प्रमाण अलीकडे वाढलंय. पण सध्याच्या कठीण काळात मर्यादित स्रोतातून काम करत असल्यामुळे नाइलाजानं अनेक गोष्टी बदलाव्या लागत असल्याचं मालिकाविश्वातले काही जण सांगिताहेत; तर काहींना ट्रोलिंगविषयी तक्रार नसून त्याच्या भाषेविषयी आक्षेप आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे अनेकांचं झालेलं नुकसान लक्षात घेता यंदाच्या लॉकडाउनमध्ये परराज्यात जाऊन चित्रीकरण करण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला. विविध कारणांमुळे मालिकांचे ट्रॅक बदलावे लागले. या संपूर्ण बदलानंतर मालिकांचे नवे भाग सुरू झाले तेव्हापासून काही मालिकांना ट्रोल केलं जाऊ लागलं. अनेक आव्हानांचा सामना करत मालिकांना चित्रीकरण करावं लागतंय. निर्माती मनवा नाईक याबद्दल सांगते, 'मालिकाविश्वात आव्हानांचा सामना करत काम करण्याची सवय असते. लॉकडाउन, करोना या गोष्टी नव्हत्या तेव्हादेखील अनेक कारणांमुळे मालिकेचा ट्रॅक बदलावा लागलेला आहे. आताचं लॉकडाउन हे आव्हानच आहे पण ते जास्त काळ टिकणारं आहे इतकंच.' विशिष्ट कारणांमुळे काही मालिकांचे तीन-चार भाग मुख्य कलाकारांमध्ये चित्रीत केले गेले. तर काही मालिकांनी ठरावीक प्रसंगांमध्ये 'फ्लॅशबॅक'चा आधार घेतला. यावरही टीका केली. पण त्यामागे कमी कलाकार आणि मर्यादित स्रोत ही कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे सांगते, 'प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आम्ही मालिका करतो असं मी म्हणणार नाही. कारण प्रत्येक जण आपापलं पोट भरण्यासाठी काम करतंय. पण ते करतानादेखील आम्ही वरवरचा विचार न करता आमच्यातलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. कोणालाही काम थांबायला नको असल्यामुळे सगळेच मेहनत घेताहेत.' तर दिग्दर्शक वैभव चिंचाळकर सांगतो, 'युनिटमधले सगळेच जण सगळी कामं करताहेत. अशा वेळी मालिकेबाबत ट्रोलिंग झालं तर प्रेक्षक बघताहेत म्हणून त्याबद्दल प्रतिक्रिया देताहेत असा विचार केला पाहिजे. आक्षेप फक्त काही वेळा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आहे.' मालिकेवर केल्या जाणाऱ्या टीकेत तथ्य असेल तर त्याचा विचार मालिकाकर्ते नक्कीच करत असतात. पण सरसकट विधान केलं जातं तेव्हा मात्र पडद्यामागच्या मेहनतीबद्दल बोलणं गरजेचं वाटू लागत असल्याचंही ते सांगतात. सध्या मालिकाकर्ते अनेक अडचणींतून काम करताहेत. परराज्य, कमी लोक, मर्यादित स्रोत असं काम केलं जातंय. शिवाय जाहिरातदार, टीआरपी, स्पर्धा अशा अनेक गोष्टींचाही विचार करावा लागतो. हे प्रेक्षकांनी समजून घ्यावं. 'मालिकेचा दर्जा घसरतोय' असं म्हटलं जातं तेव्हा 'ट्रोलिंगच्या भाषेच्या दर्जाचं काय?' असा प्रश्न विचारावासा वाटतो. - मुग्धा गोडबोले-रानडे, लेखिका, सध्या मालिकांमध्ये कराव्या लागणाऱ्या बदलांवर प्रेक्षक लगेच प्रतिक्रिया देतात. त्याक्षणी आताची परिस्थिती समजून घेतली तर बरं होईल, असं वाटतं. पण नंतर आव्हानात्मक परिस्थितीत काम करत राहणं आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं यासाठी व्यवसायाचा भाग म्हणून आम्ही काम करतोय हे लक्षात येतं. सध्याच्या काळात येत असलेल्या प्रतिक्रियांची भाषा सौम्य व्हायला हवी. - वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक, माझ्या दोन्ही मालिकांना ट्रोलिंगचा अनुभव नाही. तसंच सध्याच्या परिस्थितीतही काम करताना कोणतीही तडजोड केली जात नाहीय. पण एवढं सांगू शकते एखादी कलाकृती सगळ्यांना आवडेलच असं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणारच. मी त्या प्रतिक्रिया सकारात्मरित्या घेते. पण काही आक्षेपार्ह भाषेतील प्रतिक्रियांना दुर्लक्षित करणं केव्हाही योग्य. - मनवा नाईक, निर्माती, सुंदरा मनामध्ये भरली, सौभाग्यवती हो


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wrIubA