Full Width(True/False)

स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, अभिनेत्रीने लिहिली भावुक पोस्ट

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री च्या वडिलांचे नुकतेच करोनामुळे निधन झाले. स्नेहाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. तिच्या या पोस्टनंतर कुटुंबिय आणि जवळच्या मित्र- मैत्रिणींनी यासोबतच अनेक चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. स्नेहाने वडिलांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत २७ एप्रिल रोजी बाबांचे करोनामुळे निधन झाल्याचे सांगत त्यांना आदरांजली वाहिली. स्नेहाने लिहिले, 'न्यूमोनिया आणि करोना या आजारांशी महिनाभर लढा दिल्यानंतर माझ्या बाबांचे निधन झाले. माझा सगळ्यात मोठा आधारस्तंभ मी गमावला आहे. असे दुःख, अशा वेदना मी याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या. परंतु जेव्हा आपण पालकांना गमावतो तेव्हा होणारे दुःख, होणाऱ्या वेदना कधीही न भरून येणाऱ्या असतात.' याआधीही स्नेहाने तिच्या बाबांविषयी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होते, ' प्रिय पप्पा, तुम्ही तुमच्या बोलण्यातून, तुमच्या शब्दांमधून खूप लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं. त्यामागे त्यांचा दिवस चांगला जावा, हा तुमचा उद्देश असायचा. तुम्ही अतिशय खंबीर, मनमिळावू होता. तुम्ही आम्हा सर्वांना तुमच्यासारखे खंबीर आणि धैर्यवान बनवले आहेत. तुम्ही आम्हांला आमची स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच स्वतःची किंमत ओळखायलाही शिकवले.' 'आयुष्य जगताना प्रामाणिकपणे जगण्याबरोबरच चांगले व्यक्ती म्हणून कसे वागायला हवे हे देखील तुम्ही शिकवले. तुम्ही आमच्यासाठी कायम हिरो होता आणि आहात. आता तुम्ही आमच्यासोबत नाही हा विचार कोलमडून टाकणारा आहे. तुमच्याशिवाय आमच्या आयुष्यात एकटेपणा आला आहे. आम्ही तुम्हांला शेवटचा निरोपही देऊ शकलो नाही. आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आता आयुष्य कधीही पहिल्यासारखे राहणार नाही.' स्नेहा वाघने ज्योती, वीरा चंद्रगुप्त मौर्य यांसह अनेक हिंदी आणि मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Sk9laT