मुंबई : हास्यकलाकार सुनील पालने डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पालने एका व्हिडीओमध्ये डॉक्टरांचा उल्लेख राक्षस आणि चोर असा केला होता. परंतु आता सुनील पालने या व्यक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. ट्वीट करून मागितली माफी सुनील पालने माफी मागणारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने डॉक्टरांची माफी मागितली तसेच अनेकजणांना त्याने टॅग केले आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, पीएमओ, एम्स डॉक्टर्स असोसिएशन, सीएम महाराष्ट्र यांचा समावेश आहे. हास्यकलाकार सध्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतो. एका वाहिनीशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सुनील पालने नुकताच शेअर केला होता. यात त्याने करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली व त्यांच्या कामावर आरोप करीत संशय व्यक्त केला. डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संस्थेच्या मुंबईतील अध्यक्ष डॉक्टर सुष्मिता भटनागर यांनी हा व्हिडीओ पाहिला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे १२ हजार डॉक्टर आणि ८०० पेक्षा अधिक हॉस्पिटलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेने अंधेरी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदी भाषेतील या व्हिडीओची प्राथमिक तपासणी केली. व्हिडीओमध्ये करोना काळात डॉक्टर हे एखाद्या सैतानाप्रमाणे वागत आहेत. काहीही लक्षणे नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला जातो. ते स्वतःच्या रुग्णालयात दाखल करतात आणि भरमसाठ बिल फाडतात. अशा प्रकारे अनेक आरोप करीत सुनील पाल याने डॉक्टरांवर टीका केली होती. संघटनेच्या लेखी तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी भादंवि कलम ५०० (अब्रुनुकसानी) आणि कलम ५०५ (२) (सार्वजनिक द्वेषभाव निर्माण करणारी विधाने) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आाल आहे.. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील पालने ई- टाइम्सला सांगितले की, 'माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मी माफी मागितली आहे. या व्हिडिओमधून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी पुन्हा एकदा माफी मागतो. परंतु मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. कारण डॉक्टरांना देव मानले जाते. परंतु सध्या गरीब लोकांना खूप त्रास होत आहे. मी व्हिडिओमध्ये हेच सांगितले आहे की ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे कपडे परिधान केले आहेत आणि उरलेले १० टक्के डॉक्टर लोकांची सेवा करत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. जे इमानदार डॉक्टर आहेत, त्यांना या गोष्टींमुळे वाईट वाटता कामा नये.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2R0sxtU