मुंबई- देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजन आणि बेड अभावी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत अनेक बॉलिवूड कलाकार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. काही कलाकार बेड आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. तर काही कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू यांनीही करोनाग्रस्तांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. विराट- अनुष्का एका संस्थेमार्फत करोनाग्रस्तांसाठी पैसे जमा करण्याचं काम करत आहेत. हे पैसे गरजूंच्या उपचारासाठी खर्च केले जाणार आहेत. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत अनुष्काने लिहिलं, 'आपला देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणादेखील खूप अडचणींचा सामना करत आहेत. आपल्याच लोकांना असं त्रासलेलं आणि ऑक्सिजनशिवाय तडफडताना पाहून आमचं मन तुटत आहे. त्यामुळे मी आणि विराटने मिळून एक उपक्रम सुरू केला आहे. यात आम्ही किटो सोबत मिळून करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे गोळा करत आहोत.' व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्काने म्हटलं, 'देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आम्हाला ही परिस्थिती पाहून दुःख होतंय. आम्ही त्या लोकांचे आभारी आहोत जे या परिस्थितीत करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिवसरात्र झटत आहेत.' त्यासोबतच त्यांनी लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार पैसे दान करण्याचं आवाहन केलं आहे. यापूर्वी सोनू सूद, सलमान खान, अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, प्रियंका चोपड़ा, रितिक रोशन सारख्या अनेक कलाकारांनी करोनाग्रस्तांची मदत केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vNK4Eu