Full Width(True/False)

वॉचमन ते बॉलिवूड स्टार, नवाझुद्दीनचा थक्क करणारा प्रवास

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा आज ४७ वा वाढदिवस. १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशच्या बुढानामध्ये जन्मलेल्या या अभिनेत्यानं नायकाच्या चेहऱ्याची व्याख्याच बदलून टाकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर नावझनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं मात्र इथंपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी नक्कीच सोप्पं नव्हतं. त्यासाठी त्याला बराच मोठा संघर्ष करावा लागला आहे. नावाझुद्दीन सिद्दीकीनं १९९९ मध्ये 'सरफरोश' या चित्रपटातून त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. त्याच्या या पदार्पणाबद्दल फारसं कोणाला माहीतही नव्हतं. जवळपास २०१२ पर्यंत नवाझनं चित्रपटामध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्यातून त्याला काही खास असं यश मिळालं नाही. त्यानंतर अनुराग कश्यपनं त्याच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी नवाझुद्दीनला कास्ट केलं. नवाझनं या चित्रपटात फैजल ही व्यक्तिरेखा साकारली आणि या भूमिकेसोबतच त्याचा अनेक वर्षांचा संघर्ष अखेर संपला. फैजल या व्यक्तिरेखेनं नवाझुद्दीनला घरा-घरात ओळख मिळवून दिली. असं वाटलं जसं कोणी नवा अभिनेता बॉलिवूडमध्ये आला आहे. पण सत्य तर हे होतं की स्वतःची वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या भूमिकेसाठी नवाझुद्दीन अनेक वर्षांपासून संघर्ष करत होता. या काळात त्यानं केमिस्टच्या दुकानात काम आणि वॉचमनची नोकरी देखील केली. आज नवाझुद्दीन बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. नायकाच्या भूमिकेसाठी असावा लागणारा हँडसम चेहरा, दमदार व्यक्तीमत्व किंवा शरीरयष्टी, गुड लुक या सर्वच व्याख्या नवाझनं बदलून टाकल्या. आपल्या दमदार अभिनयानं त्यानं सर्वांची मनं जिंकली. नावझुद्दी त्याची प्रत्येक भूमिका तेवढ्याच ताकदीनं निभावताना दिसतो. यासाठी तासंतास तो एका बंद खोलीमध्ये स्वतःच्या भूमिकेचा सराव करतो. खऱ्या आयुष्याप्रमाणे तो ती व्यक्तिरेखा जगतो आणि साकारतो. आपल्या प्रत्येक चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर नवाझुद्दीन त्याच्या गावी निघून जातो. याबद्दल एका मुलाखतीत नवाझनं खुलासा केला होता. तो म्हणाला, 'जेव्हा मी चित्रपटाचं शूटिंग संपवतो तेव्हा गावी जाऊन शेतात काम करतो. तिथे काही वेळ व्यतित करतो आणि यामुळे माझ्या मनाला शांतता मिळते आणि नव्या व्यक्तिरेखेसाठी मी पुन्हा तयार होतो.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wiueBT