मुंबई: कॉमेडियन सुनील पालच्या विरोधात मुंबईमध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सुनील पालनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यानं करोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर आक्षेपार्ह टीका केली होती. सुनीलनं म्हटलं होतं, '९० टक्के डॉक्टर राक्षस आहेत आणि ते रुग्णांना घाबरवत आहेत.' त्यानंतर सुनील पालनं याबाबत माफी सुद्धा मागितली होती मात्र एका डॉक्टरनं पोलिसांकडे त्याच्या विरोधात आता FIR दाखल केली आहे. सुनील पालनं त्याच्या व्हिडीओमध्ये डॉक्टरांची तुलना राक्षसांशी केली होती. याशिवाय त्याचं म्हणणं होतं की, बरेच डॉक्टर हे चोर आहेत. ते गरीब रुग्णांची काळजी घेत नाहीत. अंधेरी पोलिसांनी डॉक्टर सुष्मिता भटनागर यांच्या सांगण्यानुसार सुनील पालच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टार सुष्मिता भटनागर या एसोसिएशन ऑफ मेडिकल कंसल्टेंट्सच्या प्रेसिडेंट आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर ई-टाइम्सशी बोलताना म्हणाला, 'मी माझ्या व्हायरल व्हिडीओवर नंतर माफी सुद्धा मागितली होती. जर मी त्या व्हिडीओमध्ये जे बोललो आहे याचं वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. पण मी जी टीका केली त्यावर ठाम आहे. कारण डॉक्टर्सना देवासमान मानलं जातं. पण सध्याच्या कठीण काळात गरीब लोकांची सतवणूक केली जात आहे. मी माझ्या व्हिडीओमध्ये एवढंच म्हणालो आहे की, ९० टक्के डॉक्टर्सनी राक्षसांचे कपडे घातले आहेत तर फक्त १० टक्के डॉक्टर्स हे लोकांची सेवा करून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. जे डॉक्टर्स प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडत आहेत त्यांना याबाबत अजिबात वाईट वाटणार नाही. अद्याप मला पोलिसांकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही.' दरम्यान अंधेरी पोलीस ठाण्याचे सीनियर इन्स्पेक्टर विजय बेलगे यांनी सुनील पाल विरोधात तक्रार दाखल केली गेल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. सुनीलच्या विरोधात भारतीय दंड संहिता (आईपीसी) कलम ५०० (मानहानी) आणि कलम ५०५ (2) (सार्वजनिक दुराचार)नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xOLeBi