Full Width(True/False)

जया- अमिताभ बच्चन यांच्या लव्हस्टोरीत होतं 'लंडन ट्वीस्ट'

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि आज त्यांच्या लग्नाचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडच्या या दिग्गज जोडीनं वैवाहिक जीवनाची ४८ वर्ष पूर्ण केली. अमिताभ बच्चन जया यांना पाहताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची पहिली भेट 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि त्याच वेळी जया बच्चन यांना पाहिल्यावर अमिताभ यांना त्यांच्याबद्दल एक अनामिक ओढ जाणावली होती. पण जया बच्चन 'एक नजर' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या. जया यांनी अमिताभ बच्चन यांचा सुपरस्टार होईपर्यंतचा प्रवास अगदी जवळून पाहिला आहे आणि या प्रवासात त्या अमिताभ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्याही राहिल्या आहेत. एका मुलाखतीत जया बच्चन यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या, 'मी त्यांना पहिल्यांदा 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. ते हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहेत त्यामुळे मी त्यांच्यापासून जरा जास्तच प्रभावित झाले होते. मला वाटलं होतं ते इतरांपेक्षा वेगळे असतील. पण जेव्हा मी असं लोकांना बोलून दाखवलं तेव्हा सर्वजण माझ्यावर हसले होते. ते आयुष्यात खूप यशस्वी होतील असं त्यांना पाहताक्षणी मला वाटलं होतं. कारण ते सामान्य कलाकारांप्रमाणे एका विशिष्ट चौकटीत बसणारे नायक नव्हते. यामुळेच मी त्यांच्या प्रेमात पडले.' जया बच्चन यांच्याशी लग्नाच्या वेळीच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलं होतं, 'मी त्याच सोसायटीत ७ व्या रस्त्यावर एका भाड्याच्या घरात राहत होतो. आमचं लग्न ठरलं होतं. लग्नाचा फार मोठा समारंभ होणार नव्हता. कुटुंबातील काही व्यक्तीच्या उपस्थितीत आम्ही लग्न करणार असं ठरलं होतं. पण त्याआधी 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला तर आमचा संपूर्ण मित्रपरिवार लंडनला व्हेकेशनसाठी जाणार असं ठरलं होतं.' बिग बींनी पुढे लिहिलं, 'कदाचित माझे आई-वडील हीच संधी शोधत होते. आमच्या लंडनला जाण्यावर बाबूजींनी कोण कोण जाणार आहे हे विचारलं. त्यासोबतच जया तुमच्यासोबत जाणार आहे का? असा प्रश्नही विचारला. त्यावर मी त्यांना 'हो, ती माझ्यासोबत असणार आहे' असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले, 'तुम्हाला जायचं आहे तर ठीक आहे पण त्याआधी लग्न करा आणि नंतर जा' झालं, पंडित आणि कुटुंबातील लोकांना कळवण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी सगळे तयार. रात्री आमची फ्लाइट होती. त्याआधी आमचं लग्न लागलं आणि माझ्या मनातले लग्नाचे प्लान मनातच राहिले.' लग्नानंतर जया बच्चन यांनी काही वर्ष चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेत. चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन सांगतात, 'प्रत्येक लग्न एक आव्हान असतं. मग माझं लग्न तरी त्याला अपवाद कसं असेल. जयाबद्दल मला एका गोष्टीचं फार कौतुक वाटतं ते म्हणजे तिनं तिच्या करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिलं. मी माझे विचार तिच्यावर कधीच लादले नाही. कुटुंबाला प्राधान्य देणं हा सर्वस्वी तिचाच निर्णय होता.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ibVPkv