मुंबई-महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसाने अनेकांचे संसार वाहून गेलेत. कित्येकांच्या घराच्या केवळ भिंती उरल्यात. रायगड, सांगली, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळून शेकडो लोक मृत्युमुखी पडलेत. अजूनही कित्येक गावं पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्याने सगळीकडे गाळ आणि चिखल साचला आहे. सगळीकडे मदतकार्य सुरू आहे. राज्यात भीषण परिस्थिती आहे. मराठी कलाकार त्यांच्या परीने होईल तितकी मदत करत आहेत. शिवाय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना देखील पुरग्रस्थांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत. परंतु, बॉलिवूड कलाकार मात्र अजूनही शांत आहेत. बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडून एकही ट्विट न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ट्विट करत अमेय यांनी बॉलिवूड कलाकारांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे. अमेय यांनी ट्विट करत लिहिलं, 'इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच महाराष्ट्रात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन करतो.' अमेय यांनी या ट्विटद्वारे बॉलिवूड कलाकारांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी अमेय यांच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. महाराष्ट्रात राहून पैसे कमावलेत आता महाराष्ट्राला मदत करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनीही अमेय यांची बाजू उचलून धरली आहे. महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. सरकारकडून दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iNofjd