Full Width(True/False)

जेडी साकारतानाचा अनुभव कसा आहे? अतुल परचुरे म्हणतात...

गौरी भिडे ० '' मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत आहात. कसा आहे अनुभव?- कधी कधी आपण फार विचार न करता एखाद्या भूमिकेला हो म्हणतो तसं काहीसं या जेडीबाबत झालं. मला आयुष्यात पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे प्रयत्न करून बघू या असा विचार केला. जेडी साकारतानाचा अनुभव फारच मनोरंजक आणि आव्हानात्मक आहे. काम आवडतंय अशा प्रतिक्रियांबरोबरच प्रेक्षकांना जेडीचा रागही येतोय. हेच त्या भूमिकेचा यश असावं. जेडी या व्यक्तिरेखेची तयारी कशी केली? - वेगवेगळ्या मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानं चेहरेपट्टी प्रेक्षकांना माहीत झालं आहे. त्यामुळे जेडी सगळ्यांपेक्षा वेगळा वाटावा यासाठी मी प्रयत्न करतोय. सूडाची भावना माझ्यात दिसणं आवश्यक होतं. तसंच महाराष्ट्र सोडून २० वर्षं अमराठी लोकांबरोबर राहिल्यानं त्याची भाषा बिघडली असावी. या दोन गोष्टी डोक्यात ठेवून काम करतोय. ० लहान मुलांमध्ये तुम्ही कायमच रमता. मुलांनाही तुम्ही खूप आवडता. याबद्दल काय सांगाल ?- मला लहान मुलं खूप आवडतात. तुम्ही त्यांना फसवू शकत नाहीत. त्यांना समोरची व्यक्ती आवडली तरच ते मैत्री करतात. मुलांना माझ्याशी मैत्री करावीशी वाटणं ही माझ्यात दडलेलं लहान मुल जिवंत असण्याची पावती आहे असं मला वाटतं. तुमच्या मनात पाप असेल, वाईट विचार असला तर मुलं तुमच्याकडे बघतही नाहीत. त्यामुळे मुलं माझ्या जवळ आनंदानं येतात ही मी एक चांगली प्रतिक्रिया समजतो. ० लॉकडाउनच्या काळानं काय शिकवलं?- लॉकडाउनमध्ये मी उत्तम कार्यक्रम, सीरिज बघितल्या. अजून खूप काही शिकायचंय, काम करायचंय ही जाणीव झाली. करोनानं काय शिकवलं तर निसर्गापुढे कुणीच नाही. मानवाला स्वत:च्या मर्यादांची जाणीव करून देणारे जे काही मोठे प्रसंग होतात त्यातला हा एक आहे असं मला वाटतं. ० ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाबद्दल काय वाटतं? तुम्ही तिथे कधी दिसणार?- विविध विषयांवरच्या फारच चांगल्या मालिका, सीरिज, चित्रपट या माध्यमावर आहेत. या माध्यमाचा भाग व्हायला मलाही नक्कीच आवडेल. चांगली संहिता, भूमिका असेल तर मी लवकरच या माध्यमावर दिसेन. ० ओटीटीमुळे चित्रपट आणि नाट्यक्षेत्राचं भविष्य अंधारात आहे असं बोललं जातय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?- प्रत्येक माध्यमाची बलस्थानं, शक्तिस्थानं वेगळी आहेत. कुटुंबाबरोबर बाहेर जाऊन नाटक किंवा सिनेमा बघण्याचा आनंद वेगळाच आहे. हा आनंद ओटीटी माध्यमावर मिळू शकत नाही. टीव्ही आला तेव्हा नाटक बंद पडेल असं बोललं गेलं. पण तसं झालं नाही. चांगल्या, दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या तर प्रेक्षक त्या बघायला नक्की येतात. नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत केलंच पाहिजे. पण त्याबरोबर जुनं सगळं पुसलं जाईल ही भीती बाळगण्याचं कारण नाही. प्रत्येक माध्यमाचं महत्त्व कायम अबाधित राहील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yFoP9m