Full Width(True/False)

इंडियन आयडलच्या मंचावर आशा भोसले; 'या' स्पर्धकाचं कौतुक करत त्याच्यासोबत केला डान्स

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, शनमुखा प्रिया, दानिश मोहम्मद, निहाल तारो, आशिष कुलकर्णी या स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे. या स्पर्धकांपैकी कोण विजेता होणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दर आठवड्याला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या खास व्यक्तीला बोलवले जाते. या पर्वामध्ये आतापर्यंत रेखा, नितू कपूर, अमित कुमार, शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा यांसारखे दिग्गज कलाकार आतापर्यंत सहभागी झाले आहेत. इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या या आठवड्याअखेरीस प्रसारित होणारा कार्यक्रम एकदम खास आहे. कारण या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका सहभागी होणार आहेत. आशा भोसले यांचे या कार्यक्रमातील उपस्थिती केवळ स्पर्धकांसाठी नाही तर परीक्षकांसाठी देखील खास असणार आहे. या भागाचा व्हिडीओ रिलीज झाला आहे. केवळ इतकेच नाही तर या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या हस्ते इंडियन आयडल १२ स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण केले जाणार आहे. आशा भोसले यांनी या ट्रॉफीची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता ही झळाळणारी ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे आगामी काळात कळणार आहे. दरम्यान या आठवड्याअखेरीस प्रसारित होणा-या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये पवनदीपने 'ये राते ये मौसम नदी का किनारा...' हे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचे गीत गाताना दिसत आहे. केवळ इतकेच नाही तर पवनदीपने गाणे गाण्याबरोबरच चक्क आशा भोसले यांच्यासोबत एक रोमँटिक डान्स देखील केला आहे. हा डान्स करताना त्याने आशाजींना गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल दिले आहे. पवनदीपने असे केल्यामुळे आशा भोसले त्याला म्हणतात, 'मी तर तुझ्या प्रेमातच पडले आहे...' पवनदीप हा या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. आतापर्यंत कार्यक्रमात जे जे पाहुणे आलेत, त्या सर्वांना पवनदीपचे गाणे खूप आवडले आणि सर्वांनी त्याचे भरभरून कौतुकही केले आहे. पूनम सिन्हा जेव्हा या कार्यक्रमात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी देखील पवनदीपचे भरभरून कौतुक केले होते. कार्यक्रमाचे स्पर्धक येणारे प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षकही पवनदीपच्या गाण्याचे भरभरून कौतुक करत आहेत. अर्थात कार्यक्रमातील इतर स्पर्धक देखील तितकेच गुणी आणि प्रतिभावान आहेत. त्यामुळे हे सर्वजण विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. अलिकडेच कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने ग्रँड फिनाले कधी आणि कसा असेल याची माहिती एका मुलाखतीमध्ये दिली होती. त्याने सांगितले होते, ' सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळेजण मुंबईत परतलो आहोत. अर्थात येथील देखील काही नियम आम्हाला कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी पाळावे लागत आहेत. तरी देखील त्या सर्व नियमांचे पालन करत ग्रँड फिनाले जोरदार करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. आमचे सर्व स्पर्धक अतिशय गुणी आणि छान गाणी गात आहेत.ग्रँड फिनालेमध्ये संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले जुलै अखेरीस होणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण खूपच उत्सुक आहोत. खूप सकारात्मक गोष्टी घेऊन आम्ही काम करत आहोत. कार्यक्रमासंबंधी ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्याकडे आम्ही दु्र्लक्ष करत आहोत. कारण कार्यक्रमाचे हे पर्व आम्हाला सकारात्मक नोटवर संपवायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण खूप मेहनत घेत आहोत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qY3TaH