जणू माझी बहीणच माझ्यात आणि उर्मिला कानेटकरमध्ये वयाचं बरंच अंतर आहे. आमची ओळख आधी होती; पण मैत्रीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 'एकापेक्षा एक' या कार्यक्रमाच्या मंचावर. तिथे मी तिची कोरिओग्राफर होते. तेव्हापासून एकमेकींकडे येणं-जाणं वाढलं. त्यानंतर आम्ही एका चित्रपटासाठी एकत्र कामही केलं. तेव्हा मैत्री अधिकच घट्ट झाली. आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत. म्हणूनच आमचं छान जुळत गेलं. तिच्या लग्नातला संगीत सोहळा मी बसवला होता. माझी मुलगी आणि उर्मिला यांच्यातही छान मैत्री आहे. आता आमचं नातं मैत्रीपुरतं मर्यादित न राहता ते बहिणींसारखं झालं आहे. - फुलवा खामकर, कोरिओग्राफर मैत्रीचं डोंबिवली कनेक्शन मी आणि महेश लिमये आम्ही दोघंही डोंबिवलीत राहायचो. त्यामुळे विविध स्पर्धांच्या निमित्तानं भेट व्हायची. दहावीच्या सुट्टीत जे वर्ग भरायचे तिथेही आम्ही बरोबर असायचो. दहावीनंतर आमचे मार्ग वेगळे झाले आणि थेट भेट झाली ती जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये. एकाच शहरात राहत असल्याने एकत्र ट्रेननं प्रवास व्हायचा. या सगळ्यात आमची मैत्री खुलत गेली. मनोरंजनसृष्टीतील त्याच्या कामाविषयी मी ऐकत होतो. आम्ही एकत्र सिनेमा करायला हवा असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर आम्ही काही चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. आम्ही सेटवर खूप मजा करतो आणि एकमेकांना 'काय रे गड्या काय करतोय' असं म्हणतो. डोंबिवलीच्या नाक्यावरची दोन मुलं आज खूप पुढे गेली; याचा आनंद आहे. आम्ही ठाण्यातही जवळच राहतो. त्यामुळे सणांच्या निमित्तानं भेटीगाठी होतातच. - रवी जाधव, दिग्दर्शक ३० वर्षांची दोस्ती माझी आणि किशोर कदमची ओळख कॉलेजच्या दिवसांत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या दरम्यान झाली. आमच्या कॉलेजच्या 'कैलासवासी पार्ले' या एकांकिकेत मी अभिनयासह गाणंही गायचो. त्यावेळेस दुसऱ्या कॉलेजच्या एकांकिकांमध्ये अडथळा निर्माण व्हावा म्हणून अधेमधे मुद्दाम मजा केली जायची; पण आमच्या एकांकिकेत मी गायला आलो आणि किशोरनं त्याच्या मित्रांना तसं करण्यापासून रोखलं. एकदा एकांकिका संपल्यावर किशोर आणि अतुल दाते विंगेत आले आणि माझं कौतुक केलं. तेव्हा 'मैत्री करशील का' असं किशोरनं मला विचारलं आणि तिथून मैत्रीची सुरूवात झाली. एकमेकांचे पत्ते घेतले, भेटी वाढल्या. आम्ही एकमेकांकडे गाण्याच्या तालमी करायचो. किशोरने मला त्याच्या 'दिस नकळत जाई' या कवितेला चाल लावायला सांगितलं आणि मी पहिल्यांदा कवितेला चाल लावली. अशी आमची ३० वर्षांची मैत्री आहे. - मिलिंद इंगळे, संगीतकार ...आणि एकत्र काम केलं एकदा ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या एका कार्यशाळेत मी आणि मुक्ता बर्वे सहभागी झालो होतो. पण तेव्हा आमची फारशी ओळख नव्हती. त्यामुळे खऱ्या अर्थानं आमची भेट झाली ती 'एक डाव धोबी पछाड' या सिनेमाच्या सेटवर. या सिनेमानंतर आम्ही 'अग्निहोत्र' ही मालिका एकत्र केली आणि तिथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू लागलो. मग त्यानंतर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'बदाम राणी गुलाम चोर' हे चित्रपट, 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका असे बरेच प्रोजेक्टस आम्ही केले. आमची मैत्री घट्ट झाली. त्यानंतर मुक्ता माझ्या बायकोचीसुद्धा मैत्रीण झाली. माझ्या मुलीसाठी तर मुक्ता एक आदर्श व्यक्ती आहे. ती मुक्ताची मोठी चाहती आहे. - सतीश राजवाडे, दिग्दर्शक संकलन: संपदा जोशी
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3C3DZaD