Full Width(True/False)

चेहरे: न्यायाचा खेळ

काही व्यवसाय असे असतात, जे निवृत्तीनंतरही त्या व्यक्तीच्या आत दडलेले असतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं, तर गुन्हे शाखेतला पोलिस अधिकारी निवृत्तीनंतरही समोरच्या माणसाला खाकी नजरेतूनच पाहतो. प्रत्येक घटनेत त्याला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याचे संकेत मिळत असतात. त्याची नजर पुरावे, गुन्हेगार शोधण्याच्या प्रयत्नांत असते. अशा माणसाचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या व्यवसायाशी इतकं जोडलेलं आणि एकरूप झालेलं असतं, की शेवटच्या श्वासापर्यंत ते वेगळं करता येत नाही. असंच काहीसं ‘चेहरे’ या चित्रपटात आहे. कथानकातली गूढता, पटकथेची बांधणी, पात्रांची निवड, उत्कृष्ट अभिनय आणि समर्पक छायाचित्रणाची जोड, अशी चित्रपटासाठी आवश्यक असलेली भट्टी ‘चेहरे’साठी दिग्दर्शक रुमी जाफरीनं जमवली आहे. या चित्रपटात निवृत्त मित्रांची गोष्ट आहे. हे चार मित्र आहेत, एक निवृत्त न्यायाधीश जगदीश आचार्य (), निवृत्त वकील लतीफ झैदी (), निवृत्त सरकारी वकील परमजीत सिंह () आणि निवृत्त जल्लाद हरिया (). हे चौघे निवृत्त झाले असले, तरी ते आजही सजग आहेत. ‘कायद्याच्या नजरेतला न्याय’ सिद्ध करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपला उतारवयातला वेळ सत्कारणी लावण्यासाठी हे चौघं एक खेळ खेळतात. हा खेळ आहे ‘मॉक ट्रायल’चा. न्यायाधीश आचार्य यांच्या घरात हे मित्र एकत्र जमतात आणि न्यायालयाचा खेळ एका अनोळखी व्यक्तीबरोबर खेळतात. ज्याप्रमाणे न्यायालयात संभाव्य अपराधी असलेल्या व्यक्तीसाठी सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलात युक्तिवाद होतो; तसाच युक्तिवाद त्या घरात केला जातो. समीर मेहरा () ही व्यक्ती काही कारणांमुळे त्या न्यायाधीशांच्या घरात अडकते. हे घर बर्फाच्छादित प्रदेशात आहे. बाहेर वादळ आहे. मोबाइल नेटवर्क नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येत नसतो; त्यामुळे घराच्या चार भिंतीत वेळ घालवण्यासाठी ‘न्यायालयाचा खेळ’ खेळला जातो. अपराधीच्या भूमिकेत असतो समीर आणि बाकी चार मित्र उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे न्यायाधीश, वकील आणि जल्लादच्या भूमिकेत असतात. फिर्यादी वकील लतीफ झैदी ज्यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत. वकिली पेशाचा अनुभव त्यांच्या अंगी इतका भिनलेला असतो, की एका नजरेत समोरच्या व्यक्तीविषयी ते सखोलपणे निरीक्षण मांडू शकतात. जे ते समीरबाबतही करतात. आपल्या निरीक्षणशक्तीच्या बळावर झैदी समीरवर थेट खुनाचा आरोप करतात. समीर एका जाहिरात कंपनीचा सीईओ असतो. महत्त्वाकांक्षी असलेल्या समीरनं सीईओचं पद मिळवण्यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा खून केल्याचा हा आरोप असतो. कथानकाच्या या टप्प्यावर थराराला सुरुवात होते. खेळातल्या युक्तिवादात एकामागोमाग रहस्य, गूढ उलगडत जातं. समीरच्या बचावासाठी आरोपीचे वकील सिंह हे पूर्ण प्रयत्न करत असतात. न्यायालयाचा खेळ कमालीचा रंगतो. वकील झैदी हे समीरला अपराधी ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात; पण समीर अपराधी ठरतो का? तसं झाल्यास न्यायमूर्ती त्याला कोणती शिक्षा सुनावतात? त्या शिक्षेची अंमलबजावणी होते का? या सगळ्याची उत्तरं चित्रपटात मिळतात. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या तोंडी असलेल्या संवादांना त्यांनी चार चाँद लावले आहेत. संवाद लेखकाचंही तितकंच कौतुक करायला हवं. चित्रपटाच्या उत्तरार्धात युक्तिवाद करताना बच्चन यांनी सादर केलेला अभिनय प्रशंसेच्या पलीकडचा आहे. इम्रान हाश्मीनंदेखील त्याची भूमिका लीलया साकारली आहे. सगळ्यांच कलाकारांचा अभिनय उत्तम. निर्मिती आणि तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट जमला आहे. (हा चित्रपट महाराष्ट्र सोडून इतरत्र प्रदर्शित झाला आहे.) चेहरे निर्मिती : आनंद पंडित दिग्दर्शक : रुमी जाफरी लेखन : रणजित कपूर, रुमी जाफरी कलाकार : अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, ध्रुतीमन चॅटर्जी, अन्नू कपूर, रघुवीर यादव, छायांकन : विनोद प्रधान संकलन : बोधादित्य बॅनर्जी दर्जा : ३.५ स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zybmB6