मुंबई- 'बिग बॉस मराठी' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. वीणा तिच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. वीणाच्या फोटोंना चाहत्यांचा भरघोस प्रतिसादही मिळत असतो. परंतु, जिथे लोकप्रियता आली तिथे वाईट बोलणारे काही युजर्सही आलेच. हे ट्रोलर्स कलाकारांना ट्रोल करण्याची जणू संधी शोधत असतात. वीणादेखील या ट्रोलर्सना कंटाळली आहे. खोट्या नावाने कमेंट करून वाईट बोलणाऱ्या या ट्रोलर्ससाठी वीणाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यांना वीणा आवडत नाही त्यांनी तिला अनफॉलो केलं तरी चालेल, असं वीणाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वीणाने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. वीणाने लिहिलं, 'ज्यांना माझा किंवा माझ्या कोणत्याही वागण्याचा त्रास होतो किंवा राग येतो त्यांनी मला सोशल मीडियावर लगेच अनफॉलो केलं तरी चालेल. मला त्याने काहीही फरक पडणार नाही. इथे असे काही लोक आहेत ज्यांच्या मनात वाईट आहे आणि ते माझ्या नावाचे खोटे आयडी बनवून मला आणि माझ्या समाजातील प्रतिमेला हानी पोहोचवू इच्छित आहेत. सगळ्यात आधी तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या खऱ्या नावाने माझ्या समोर येऊन दाखवा. खरं तर उगीचचं संभाषण आणि फुटकळ सल्ल्यांसोबत माझ्याशी बोलायला येऊ नका. मला शांततेत राहू द्या.' अशी पोस्ट करत वीणाने ट्रोलर्सची शाळा घेतली आहे. वीणाच्या चाहत्यांनी देखील तिच्या या पोस्टवर वीणाचं कौतुक केलं. वीणाला समर्थन देत तिची पोस्ट योग्य असल्याचं युझर्सनी म्हटलं. परंतु, काही काळाने वीणाने ही पोस्ट डिलीट केली. 'बिग बॉस मराठी' च्या दुसऱ्या सीजनमध्ये शिव ठाकरे आणि वीणाची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडली होती. वीणाने 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून घराघरात स्थान मिळवलं. वीणाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VyNM8z