मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये जे निर्बंध घातले होते, ते आता टप्प्याटप्याने शिथील केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अल्पप्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांवरील निर्बंध अद्याप कायम आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. सरकारने नाट्यप्रयोगांना आणि चित्रपटगृहांमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी आता तरी परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी सातत्याने मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळी करत आहेत. परंतु त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत सर्वच पक्षांचे राजकीय नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यात दंग आहे. त्यातच आता दहीहंडी साजरी करण्यावरून राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते मंडळी गर्क झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून दहीहंडीवरून एकमेकांवर कुरघोडी करण्यात दंग झालेल्या सर्वच राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. केदार शिंदे यांनी नेमके आणि अचूक मत व्यक्त केले असल्यामुळे त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. काय म्हणाले केदार शिंदे करोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथील होत असताना त्यात नाटकांचा आणि सिनेमांचा समावेश करावा, अशी मागणी सातत्याने मनोरंजन विश्वातून होत आहे. ही मागणी करणाऱ्या मंडळींमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांचाही समावेश आहे. करोनाचे सर्व नियम पाळून नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग सुरू केले जावे, अशी मागणी केदार यांच्यासह अनेक कलाकार मंडळी करत आहेत. ते सातत्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. याच संदर्भात केदार शिंदे यांनी पुन्हा एक ट्वीट केले. त्यांनी यात लिहिले की, 'राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रमात मग्न आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. गेल्या २ वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय, याकडे कुणाचही लक्ष नाही.' केदार शिंदे यांनी व्यक्त केलेल्या मतावर अनेकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे सिनेमा आणि नाट्यगृहे बंद आहेत. मात्र, आता नाट्य आणि चित्रपटगृहे खुली करावीत अशी मागणी होत आहे. पुण्यात महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरात तर मुंबईत शिवाजी मंदिर येथे रंगकर्मींनी आंदोलन केले. या आंदोलनात नटराजाची आरती आणि जागरण गोंधळ घालण्यात आला. या दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये अनेक कलाकार, तंत्रज्ञ सहभागी झाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kIqkOD