Full Width(True/False)

लिंबू सरबतापेक्षा बिअर स्वस्त! विजू माने यांच्या बिलाचा आकडा वाचून नेटकरी चकित

मुंबई- पावसाळा संपला की आपल्याला हिवाळ्याचे वेध लागतात. पण या हिवाळ्यापूर्वी सुरू होते ती ऑक्टोबर हिट. ऑक्टोबरचं वातावरण म्हणजे सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस. या कडक उन्हात आपण अनेकदा लिंबू सरबताला प्राधान्य देतो. इतर कशानेही न भागणारी तहान लिंबू सरबताने भागवली जाते. मात्र ठाण्यात लिंबू सरबत पिणं मराठमोळे दिग्दर्शक यांना भलतंच महाग पडलं आहे. भर दुपारी लिंबू सरबत प्यायल्यावर त्यांच्यासमोर आलेल्या बिलाचा आकडा पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विजू त्यांचा मित्र कुशल बद्रिके सोबत ठाण्यातील एका हॉटेलमध्ये लिंबू सरबत प्यायला गेले असताना त्यांना दोन ग्लास लिंबू सरबतासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल ३२५ रुपये बिल भरावं लागलं आहे. त्यामुळे लिंबू सरबतापेक्षा बिअर स्वस्त आहे, असं ते म्हणत आहेत. विजू यांनी ही घटना एका फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. विजू यांनी लिहिलं, 'मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बीयर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. ( हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे)...' हॉटेलमध्ये लिंबू सरबत पिणं विजू यांना भलतंच महागात पडलं आहे. विजू यांनी त्यांच्या पोस्टसोबत बिलाचा फोटोदेखील शेअर केला आहे. बिलाचा आकडा पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेक युझर्सनी विजू यांच्या पोस्टवर निरनिरळ्या कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'जरा वेगळं काही करून बघणं हे महागातच पडतं नेहमी.' आणखी एका युझरने लिहिलं, 'उन्हाळा चांगलाच चटका लावून गेला.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'आता हे लिंबू लोन उतरवणार कसं?'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lr9CVm