ओळख पटवून देणाऱ्या कोणत्याही कागदपत्रावर किंवा अर्जावर 'स्त्री', 'पुरुष' असा रकाना असतो. आता तर 'ट्रान्सजेंडर' हा रकानादेखील काही कागदपत्रांवर समाविष्ट करण्यात आला आहे. लहानपणापासूनच तू 'मुलगा', तू 'मुलगी', त्यानं असे कपडे घालायचे, तिनं तसे... हे सगळं सांगितलं जातं. या स्वत्वाची स्वतः ओळख करुन घेताना ते लहान मूल काही वेळा गोंधळूनही जातं. पण, वयाच्या एका उंबरठ्यावर त्या मुलाला, मुलीला, व्यक्तीला स्वत्वाची ओळख होते. पण, ही ओळख खरंच समाजमान्य आहे का? जसजसं विज्ञान प्रगती करतंय, 'त्याच्या' किंवा 'तिच्या' मानवी संवेदना समाज आणि न्यायव्यवस्था स्वीकारत आहे; तसतशी स्वत्वाची आणि समाजमान्यतेमधली दरी कमी होतेय. तुम्ही एक 'स्त्री' आहात किंवा 'पुरुष'; याच तुमच्या स्वत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर तुम्ही काय कराल? तो मानसिक धक्का तुम्ही पचवू शकाल का? या प्रश्नामुळे तुमच्या दैनंदिन जीवनाचा आणि करिअरचा मार्ग विस्कटला तर तुम्ही काय कराल? याचं समर्पक उत्तर '' हा सिनेमा देतो. तापसी पन्नूनं यापूर्वी तिच्या काही सिनेमांमधून 'स्त्री'चे विविध पैलू सादर केले आहेत. आता पुन्हा एकदा 'ती'च्या स्वत्वाच्या शर्यतीची गोष्ट तापसी आणि दिग्दर्शक आकर्ष खुरानानं मांडली आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों यांनी ही गोष्ट लक्षवेधी पद्धतीनं रचली आहे. सिनेमामध्ये स्वत्वाची शर्यत अतिशय समर्पकपणे मांडण्यात आली आहे. या स्वत्वाचा दृष्टांत देण्यासाठी लेखक, दिग्दर्शक आपल्याला एका महिला खेळाडूची गोष्ट सांगतो आणि दाखवतो. कोणताही खेळ हा सर्वसाधारणपणे दोन विभागात, गटात वेगवेगळा खेळाला जातो. महिला गट आणि पुरुष गट. ही विभागणी करत असताना खेळांमध्ये लिंग चाचणीदेखील केली जाते. हाच सामाजिक मुद्दा सिनेमात अधोरेखित करण्यात आलाय. जागतिक खेळाडू बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका धावपटू मुलीची ही गोष्ट आहे. नियमांच्या चौकटीत ती अडकली आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित नसला तरी लिंग चाचणीच्या नावाखाली महिला खेळाडूंना शोषणाचा सामना करावा लागतो हे वृत्तमाध्यमातून समजतं. पूर्वग्रह दूषित ठेवून महिला खेळाडूंचे लिंग परीक्षण केलं जातं. त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची मात्रा अधिक असल्यास त्यांना स्पर्धेबाहेर केलं जातं. कारण, या संप्रेरकाची मात्रा पुरुषांमध्ये अधिक असते. हीच गोष्ट मनोरंजक स्वरुपात 'रश्मी रॉकेट'मध्ये आहे. सिनेमाची गोष्ट महिला खेळाडूंच्या वसतिगृहापासून सुरू होते. पुरुष पोलिस अधिकारी वसतिगृहात येतात आणि रश्मीला (तापसी पन्नू) जबरदस्ती अटक करुन घेऊन जातात. रश्मीचा गुन्हा काय आहे? हे कुणालाच माहीत नाही. मुलींच्या वसतिगृहात एक 'मुलगा' शिरला असल्याची तक्रार असल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर रश्मीला अटक केली जाते. यानंतर, सिनेमाची पटकथा थेट चौदा वर्षांपूर्वी गुजरातमधील भुजमध्ये स्थिरावते. इकडून सिनेमात रश्मीची बालपणापासून तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कथा टप्याटप्यानं प्रेक्षकांसमोर येते. धावणे या तिच्या आवडीला ती करिअर म्हणून बघते. काही कारणास्तव ती धावणे थांबवते. दरम्यान तिची भेट गगन (प्रियांशु पैन्युली) या तरुण सैन्य अधिकाऱ्याशी होते. रश्मीची गगनशी मैत्री होते. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं आणि गगनच्या प्रोत्साहनामुळे ती पुन्हा एकदा धावणं सुरु करते. जिल्हा, राज्य, देश स्तरावरील शर्यतीत रश्मी स्वतःला सिद्ध करुन दाखवते. तिची निवड भारताच्या धावपटूंच्या महिला संघात होते. इकडेही ती सुवर्णकामगिरी करुन विविध स्पर्धांमध्ये अव्वल ठरते. पण, २००४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी असं काही घडतं, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. लिंग चाचणीच्या नावाखाली तिचं शोषण होतं. आता हे कोण? का? कशासाठी करतं? याची उत्तरं सिनेमात मिळतात. करिअरच्या शिखरावर असताना रश्मीला खेळण्यासाठी मनाई केली जाते. तिच्या स्त्रीत्वावर प्रश्न विचारले जातात? हे प्रकरण न्यायालयात जातं. आता रश्मी स्वतःच्या स्त्रीत्वाचा दाखल देते का? न्यायव्यवस्था, समाज या घटनेकडे कसं पाहतात? हे सिनेमा बघूनच अनुभवता येईल. तापसीने रश्मीची भूमिका चोख निभावली आहे. वकिलाची भूमिका साकारणारा अभिषेक बॅनर्जीही लक्षवेधी ठरतो. त्याची देहबोली, संवदफेक, हावभाव आणि वकिली पेशातील आविर्भाव लाजवाब आहेत. एकंदरच सिनेमा सादरीकरणात आणि तांत्रिकश्रेणीत उत्तम बनला आहे. 'ती'ची ही गोष्ट पाहण्याजोगी आहे. सिनेमा : रश्मी रॉकेट निर्माते : रॉनी स्क्रूवाला, नेहा आनंद और प्रांजल खंडडिया दिग्दर्शक : आकर्ष खुराना लेखन : नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा, कनिका ढिल्लों कलाकार : , , सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, सुप्रिया पिळगावकर संकलन : अजय शर्मा, श्वेता मैथु छायाचित्र : नेहा मतियानी ओटीटी : झी५ दर्जा : तीन स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vn34KW