मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण आणि आता विकी कौशल... या सगळ्या मंडळींनी साहसी कार्यक्रम करणाऱ्या बेअर ग्रिल्ससोबत थरारक अनुभव घेतला आहे. घनदाट जंगलामध्ये, दुर्गम बेटांवर आणि खोल समुद्रात जाऊन हा कार्यक्रम करतो. बेअर ग्रिल्सच्या 'इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स' कार्यक्रमात आता सहभागी झाला. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विकीने त्याच्या मनातली भीती, कुटुंब, करिअर अशा अनेक मुद्द्यांवर मोकळपणाने संवाद साधला. हा कार्यक्रम आज शुक्रवारी डिस्कव्हरी प्लस वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. डिस्कव्हरी इंडियाच्या 'इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स' कार्यक्रमावेळी विकीने एक अॅक्टिव्हिटी करताना एका झोपडीवजा छोटाशा खोलीत प्रवेश केला. त्यावेळी विकीला त्याच्या बालपणीच्या घराची आठवण झाली. विकी म्हणाला, 'माझे बालपणीचे घर या खोलीपेक्षा थोडेसे मोठे होते. तसेच, त्या घराला स्वतंत्र स्वयंपाक घर किंवा बाथरूम नव्हते. एकाच खोलीमध्ये आमचे संपूर्ण कुटुंब राहत होते. ते लहान घर ते आजचे प्रशस्त घर असा प्रवास करताना आम्ही अनेक कठीण परिस्थितीमधून गेलो आहोत. खरेतर या प्रवासानेच मला माणूस म्हणून अधिक कणखर बनवले. या दहा बाय दहाच्या खोलीतूनच माझ्या यशाचा प्रवास सुरू झाला.' याच कार्यक्रमात बेअरने विकीला खोल समुद्रात नेले. तिथे गेल्यानंतर तो बेअरला म्हणाला,'मला खोल समुद्राची भीती वाटते. त्यामुळे मी आतापर्यंत कधीही समुद्राच्या पाण्यात गेलो नाही. तिथला अनुभवही मी घेतलेला नाही. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी खोल समुद्राची भीती दूर होईल, अशी अपेक्षा आहे.' बेअरने विकीला खोल समुद्रात मॅंग्रोव्हच्या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी मगरी, शार्क आणि सापांचा वावर सर्वात जास्त असतो. या कार्यक्रमात बेअरने विकीला ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या गोष्टी त्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल विकीने सांगितले की, 'बेअर ग्रिल्ससोबत या कार्यक्रमासाठी जाणे हा अनुभव माझ्यासाठी अद्भूत होता. जर ते नसता तर मी या अथांग अशा समुद्रामध्ये पोहण्याच्या भितीवर कधीच मात करू शकलो नसतो. हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात अविश्वसनीय आणि अतिशय महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमामुळे मला ज्या गोष्टींची भिती वाटते त्यावर मात करू शकलो. समुद्राच्या मधोमध वास्तव्य करण्याचा विचार करणे माझ्यासाठी अशक्य होते. परंतु बेअरने सातत्याने मला प्रेरणा दिल्यामुळे मी या भीतवर मात करू शकलो.' विकीसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत बेअर ग्रिल्स म्हणाला, 'विकीसोबतचा अनुभव माझ्यासाठी अतिशय खास होता. आम्ही जिथे गेलो तिथल्या समुद्रातील पाण्यात शार्क मासे होते. तिथल्या पाण्यामध्ये त्याला पोहायचे होते. ज्या व्यक्तीला चांगले पोहता येत नाही, त्याच्यासाठी हे करणे खूप कठीण होते. परंतु त्याने संपूर्ण झोकून देऊन हे काम पूर्ण केले. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की, विकीने त्याच्या भीतीवर मात केली आहे.' दरम्यान, डिस्कव्हरी इंडियाच्या इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स या कार्यक्रमात अजय देवगण देखील सहभागी झाला होता. तसेच त्या आठवड्यात या कार्यक्रमाचा टीआरपी सर्वात जास्त होता. या कार्यक्रमात आतापर्यंत सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमारदेखील सहभागी झाले होते. आता विकी कौशल सहभागी झालेला कार्यक्रम १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता डिस्कवरीवर प्रसारित होणार आहे. सध्या विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र, त्यावर विकी आणि कतरीनाने मौन बाळगले आहे. दरम्यान, विकी कौशलचा सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित सरदार उधम हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तसेच विकी मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर सिनेमात दिसणार आहे. भारतीय सेनेचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणके शॉ यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wIvOOP