अभिनेत्री : चॅनल : वॉव विथ सोनाली एकूण सबस्क्रायबर्स : १६ हजार ३०० एकूण व्हिडीओ : ४८ व्हिडीओ रीच : सुमारे ५० ते ८० हजार सोनाली फिटनेस व्हिडीओ आणि योगा अशा गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असते. तिच्या या आवडीचं रूपांतर तिनं युट्यूब चॅनलमध्ये केलं. ताजतवानं आणि फिट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे ती तिच्या चॅनलद्वारे प्रेक्षकांना सांगते. तसंच कलाकारांबरोबरचे फिटनेस संदर्भातले व्हिडीओही इथे बघायला मिळतात. 'युट्यूब हे स्वतंत्र माध्यम आहे. तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अनेक गोष्टी करू शकता. माझी आवड जपण्यासाठी आणि नव्या माध्यमावर काहीतरी करण्याच्या उद्देशानं मी चॅनल सुरू केलं. फिटनेसच्या संदर्भातल्या गोष्टी असल्यामुळे 'वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनाली' असं नाव द्यायचं ठरवलं. कलाकार फिटनेससाठी काय करतात याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी त्यांच्याबरोबर व्हिडीओ करते', असं सोनाली म्हणाली. येत्या काळात या चॅनलवर फिटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील आणि पोलिस खात्यातील व्यक्तींबरोबर व्हिडीओ बघायला मिळतील. अभिनेत्री : चॅनल : स्पृहा जोशी एकूण सबस्क्रायबर्स : ७५ हजार ७०० एकूण व्हिडीओ : १२९ व्हिडीओ रीच : सुमारे ५ ते १० हजार स्पृहा आणि तिच्या कविता हे समीकरण प्रेक्षकांना ठाऊक आहे. तिनं तिच्या या छंदाचं रुपांतर युट्यूब चॅनलमध्ये केलं. लॉकडाउनच्या काळात तिनं कवितावाचन तसंच साहित्यिक गोष्टींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. फार कमी वेळेत तिच्या चॅनलनं सबस्क्रायबर्सचा मोठा टप्पा गाठला आहे. याविषयी स्पृहा म्हणाली की, 'मी आधीपासून कविता आणि इतर गोष्टी सादर करत होते. चॅनलच्या निमित्तानं त्याला एक स्वरूप प्राप्त झालं. मी तयार केलेला व्हिडीओ प्रेक्षक का बघतील याचा विचार करून त्यांना आवडेल अशा गोष्टी मी चॅनलवर आणते. साहित्य, कला अशा गोष्टींचा मेळ घालणारं चॅनल म्हणून प्रेक्षक माझ्या चॅनलकडे बघतात आणि त्यांना दादसुद्धा देतात. लॉकडाउनमध्ये निर्बंध असलल्यानं घरातूनच व्हिडीओ करत होते. पण आता विविध ठिकाणी जाऊन आम्ही व्हिडीओ करतो.' येत्या काळात काही निसर्गरम्य वातावरणात कविता आणि अभिवाचन करण्याचं स्पृहा आणि टीमनं ठरवलं आहे. अभिनेत्री : चॅनल : निवेदिता सराफ रेसिपी एकूण सबस्क्रायबर्स : १ लाख ७७ हजार एकूण व्हिडीओ : ८४ व्हिडीओ रीच : सुमारे ४० ते ४५ हजास अभिनेत्री म्हणून वावरत असताना निवेदिता सराफ यांनी एक गृहिणी म्हणूनही त्यांची जबाबदारी पूर्णपणे बजावली. त्यातूनच त्यांच्या रेसिपी चॅनलचा जन्म झाला. प्रत्येक गृहिणीला पडलेल्या 'स्वयंपाक काय करायचा' या प्रश्नाचं उत्तर कमी वेळेत आणि दरवेळी वेगळं मिळावं या हेतूनं त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं. 'माझ्या एका मैत्रिणीनं मला या चॅनलसाठी तयार केलं आणि एक प्रयोग म्हणून आम्ही ते सुरूही केलं. प्रत्येक गृहिणीला एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे जेवणाचा. काही वेगळ्या किंवा थोड्या अवघड वाटणाऱ्या रेसिपी मी सोप्या करून दाखवण्याचा प्रयत्न करते. लवकरच शेफ असलेल्या माझ्या मुलाबरोबर मी काही पदार्थ तयार करणार आहे. तसंच आरोग्यासाठी पौष्टिक अशा रेसिपी मी तयार करणार आहे', असं त्या म्हणाल्या. अभिनेत्री : चॅनल : सुलेखा तळवलकर एकूण सबस्क्रायबर्स : ६७ हजार १०० एकूण व्हिडीओ : ९० व्हिडीओ रीच : सुमारे १ लाख ते १ लाख ५० हजार विविध कलाकृतींमधून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणून अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांची ओळख आहे. सध्याच्या काळाबरोबर चालण्याच्या हेतूनं त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमातून मनोरंजनविश्वातील कलाकारांचा आजवरचा प्रवास प्रेक्षकांना कळतोय. याविषयी सुलेखा म्हणाल्या, 'एक कलाकार म्हणून आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी नवं काहीतरी करत असतो. पण एक माणूस म्हणून समाजाला काहीतरी द्यावं या भावनेनं वर्षभरापूर्वी मी चॅनलची सुरुवात केली. कलाकार बऱ्याच गोष्टींमधून जात असतो. चॅनल आणि सेगमेंटच्या निमित्तानं मी कलाकारांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतेय आणि त्यांच्या अनुभवातून मीच शिकतेय.' येत्या काळात सिने-नाट्यसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या कलाकारांबरोबर हे सेगमेंट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ज्येष्ठ कलाकार, पडद्यामागचे कलाकार अशा मंडळींचा प्रवाससुद्धा त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. संकलन : रामेश्वर जगदाळे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dd4Vty