Full Width(True/False)

अभिनयात येण्याआधी कलाकारांनी लष्करात केली होती देशसेवा!

मुंबई : काल देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना, देशासाठी शहीद जवानांना मनापासून अभिवादन केलं. सिनेविश्वातही शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, सनी देओल यांसारख्या मातब्बर कलाकारांनी देशभक्तीपर सिनेमांत काम केलं आहे. त्यांचे हे सिनेमे खूप लोकप्रिय देखील झाले. याशिवाय काही कलाकार असेही आहेत की त्यांनी अभिनयाच्या विश्वात येण्यापूर्वी देशाच्या संरक्षण विभागात काम केलं. काही कलाकारांनी जवान म्हणून तर काहींनी कर्नल म्हणून देशसेवा केली. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल. विक्रमजीत कंवरपाल मेजर विक्रमजीत कंवरपाल यांचं मे २०२१ मध्ये करोनामुळे निधन झाले. विक्रमजीत यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याआधी त्यांनी सुमारे १२ ते १३ वर्षे लष्कारात राहून देशसेवा केली होती. विक्रमजीत यांचे वडील द्वारकानाथ कंवरपाल हे भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी बजावलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रमजीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८९ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले. १३ वर्ष देशसेवा केल्यानंतर ते २००२ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर २००३ मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात सक्रीय झाले. त्यामध्ये स्पेशल ऑप्स, डॉन, पेज ३, कॉर्पोरेट, रॉके सिंह, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स, इंदू सरकार, शौर्य, जंजीर, प्रेम रतन धन पायो यांसारख्या ४१ सिनेमांमध्ये काम केले. तसेच एकता कपूरच्या ये हैं चाहते, दीया और बाती हम, दिल ही तो है या मालिकांमध्येही काम केले होते. मोहनलाल यांना मल्याळम सिनेविश्वातील देवच मानले जाते. मोहनलाल यांना पहिल्यापासूनच भारतीय लष्कराबाबत प्रेम, सन्मान होता. त्यांना देखील लष्करात भरती व्हायचं होतं पण ते अभिनयाच्या क्षेत्रात आले. अभिनयाच्या क्षेत्रात असूनही त्यांना लष्कर आणि सैनिकांबद्दल असलेलं प्रेम, आदर तसूभरही कमी झाला नाही. त्यांनी आपल्या लोकप्रिय असल्याचा फायदा घेत युवकांना लष्करात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही तर त्यांनी स्वतः देखील २००९ मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती होण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूरदेखील झाला. त्यांना लेफ्टिनेंट कर्नल हे सन्मान देखील देण्यात आला. भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्याला हा सन्मान देण्यात आला आहे. दरम्यान, मोहनलाल यांनी किर्तीचक्र, कुरुक्षेत्र, कंधार सारख्या सिनेमांत लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकांमुळे युवक भारावून गेले होते. मेजर रुद्राशीष मजुमदार ने भारतीय लष्करात काम केलं. ११ जून २०११ मध्ये तो लष्करी सेवेत जॉईन झाला तर ७ जुलै २०१८ मध्ये निवृत्ती घेतली. रुद्राशीषने राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज- देहरादून, राष्ट्रीय लीसी- कोलकाता, नॅशनल डिफेंस अकादमी, खडकवासला- पुणे आणि इंडियन मिलिट्री अकादमी देहरादून येथे शिक्षण घेतलं. त्याने झंगर आणि माछिल सेक्टरमध्ये असलेल्या एलओसीवर सिखलाइट इन्फैंट्रीमध्ये देशसेवा केली. त्यानंतर बेंगदुबी आणि जालंदर येथेदेखील तो पोस्टिंगला होता. सात वर्ष सर्विस केल्यानंतर ते मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर मेजर रुद्राशीषने सुशांतसिंह राजपूतसोबत 'छिछोरे' सिनेमात काम केलं. याशिवाय त्याने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' सिनेमात काम केलं आहे. याशिवाय 'एमजी हेक्टर' 'कोका कोला' यांसारख्या उत्पादनांच्या जाहिरातीमध्येही काम केलं आहे. महाभरातामध्ये शकुनीची भूमिका गुफी पेंटल यांनी साकारली होती. फार कमी जणांना माहिती असेल की गुफी पेंटल यांनी देखील भारतीय लष्करामध्ये काम केले होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुफी यांनी सांगितले होते की, जेव्हा भारत आणि चीनमध्ये १९६२ मध्ये युद्ध झाले तेव्हा ते इंजिनिअरींग शिकत होते. त्यावेळी भारतीय लष्करामध्ये थेट भरती प्रक्रिया सुरू झाली होती, त्यावेळी त्यांनी अर्ज केला होता. इतकेच नाही तर त्यांची निवड होऊन त्यांचे पोस्टिंग चीन बॉर्डवरील आर्मी आर्टिलरीमध्ये झाली होती. तिथे त्यांनी काही दिवस काम केले त्यानंतर त्यांची बदली टाटा इंजिनिअरींग अँड लोकोमोटिव ब्रँचमध्ये झाली. त्यानंतर त्यांनी मनोरंजन विश्वामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांना टीव्ही मालिकांमध्ये आणि सिनेमांत काम मिळू लागली. १९७८ मध्ये त्यांनी 'दिललगी' मध्ये गणेश ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गुफी यांनी १९८८ मध्ये बीआर फिल्ममध्ये टेक्निकल हेड पदावर काम करायला सुरुवात केली. यावेळीच त्यांना महाभारतामधील शकुनीची भूमिका मिळाली. त्यांना प्रत्येक भागासाठी मानधन म्हणून तीन हजार रुपये मिळत होते. गुफींनी सांगितले की, जेव्हा ते लष्करात होते तेव्हा रामलीला कार्यक्रमात काम करायचे. त्यामध्ये ते सीतेची भूमिका करायचे. गुफी यांनी सुहाग, मैदान-ए-जंग, द रिवेंजः गीता मेरा नाम, कालो यांसारख्या सिनेमा काम केले. 'चांद सी महबूबा हो मेरी कभी ऐसा सोचा था' यांसारखी लोकप्रिय गाणी लिहिणारे आनंद बक्षी यांनी भारतीय नौदलात काम केलं होतं. आनंद बक्षी १९४४ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले होते. परंतु भारत आणि पाकिस्तानची १९४७ मध्ये फाळणी झाली तेव्हा आनंद बक्शी यांचे संपूर्ण कुटुंब रावळपिंडीहून भारतात आले. त्यानंतर ते भारतीय लष्करात काम करायला सुरुवात केली. १९४७ ते १९५६ या काळात ते लष्करात कार्यरत होते. आनंद बक्शी यांना पहिल्यापासून गीतकार व्हायचे होते. १९५६ मध्ये त्यांनी बडा आदमी सिनेमासाठी गाणी लिहिली. परंतु फारशी लोकप्रिय झाली नाहीत. अपयश येऊनही ते निराश झाले नाही. अखेर त्यांनी लिहिलेली 'परदेसियों से न अँखिया मिलाना' आणि 'यह समा है प्यार का' यांसारखी गाणी लोकप्रिय झाली आणि आनंद बक्षीही लोकप्रिय झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AF7K1o