Full Width(True/False)

सई म्हणतेय, प्रत्येक सुख दुःखात बाप्पा पाठीशी उभा असतोच

अभिनेत्री हिनं गणपती बाप्पाशी असलेलं तिचं गोड नातं उलगडून सांगितलं आहे. ‘मी त्याला माझ्या मनातलं सगळं काही सांगते. प्रत्येक सुख-दु:खात गणरायाचा आशीर्वाद कायम पाठीशी असतोच’, असं ती सांगते. गणपती बाप्पाशी माझं खूप गोड असं नातं आहे. गणपती बाप्पा हा एकमेव असा देव आहे, ज्याला मी माझ्या मनातलं सगळं काही सांगते. कधीकधी त्याच्यावर रागावतेही. पण, बाप्पावरचा हा रुसवा फार वेळ टिकत नाही. प्रत्येक सुख दुःखात तो पाठीशी उभा असतो. त्याचा आशीर्वाद नेहमी मिळतोच. लहानपणी सांगलीला असताना गणेशोत्सवात निरनिराळे देखावे पाहायला जाणं मला फार आवडायचं. अतिशय कल्पकतेनं वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे देखावे असायचे. एका दिवशी किती गणपतींचं दर्शन घ्यायचं, कोणत्या रस्त्याने गेलं तर जास्तीत जास्त गणपती पाहता येतील, या सगळ्याचा विचार करून एक नियोजित कार्यक्रम आखला जायचा. गणेशोत्सवात संबंध दिवस अशी छान डे ट्रिप व्हायची. रात्री बारा-साडेबारा वाजता आईस्क्रीम खात मी घरी परतायचे. बाप्पाचं दर्शन घेतल्यावर एक सकारात्मक ऊर्जा मिळायची आणि अगदी तृप्त झाल्यासारखं वाटायचं. यावर्षी ही सगळी मजा खूप जास्त मिस करते आहे. खरं तर मुंबईत आल्यापासून गणपती बाप्पा आणि मी एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलो आहोत. गणपतीच्या दिवशी आवर्जून घरात गोडधोड पदार्थ तयार करते. गणपतीच्या दिवसांत काही गोष्टी मी नेमानं पाळते आणि एकूणच घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते. यंदाचा गणेशोत्सव खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय. रस्त्यांवरची लगबग, मिरवणुका, जल्लोष यातलं काहीही आपल्याला करता आलेलं नाहीय. त्यामुळे अगदी चुकल्याचुकल्यासारखं होतंय. पण, या सगळ्या गंभीर वातावरणातही एक सकारात्मक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेतोय. प्रदूषणाचं प्रमाण खूप कमी झालं आहे. पर्यावरणपूरक पद्धतीनं उत्सव साजरा होतोय, याचा आनंद आहे. पुढच्या वर्षीही अशाच प्रकारे पर्यावरणाचं नीट भान राखत, आपण अधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करू शकू, असा विश्वास वाटतो. शब्दांकन - गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lJExdU