Full Width(True/False)

एकांकिका करत टीव्ही इंडस्ट्रीत नव्या कलाकारांची एन्ट्री

लॉकडाउननंतर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या नवीन मालिकांमध्ये अनेक नवे चेहरेही झळकताना दिसताहेत. हे तरुण चेहरे एकांकिकाविश्वातून पुढे आले आहेत. नाटक, एकांकिका करत आता टीव्ही इंडस्ट्रीत स्थिरावू पाहणाऱ्या या नव्या दमाच्या कलाकारांविषयी..

साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. बहुतांश मालिकांचे नवेकोरे भाग पाहायला मिळताहेत. साडेतीन महिन्यांच्या ब्रेकनंतर आता मालिकेत बदल झाल्याचं प्रेक्षकांना जाणवणार आहे; किंबहुना तो फरक आतापर्यंत जाणवलाही असेल. मालिकांमध्ये काही जुने चेहरे जाऊन त्या जागी आता नव्या चेहऱ्यांची एंट्री झाली आहे. काहींनी करोनाच्या धोक्यामुळे तर काहींनी वैयक्तिक कारणास्तव मालिका सोडलीय.


एकांकिका करत टीव्ही इंडस्ट्रीत नव्या कलाकारांची एन्ट्री

लॉकडाउननंतर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या नवीन मालिकांमध्ये अनेक नवे चेहरेही झळकताना दिसताहेत. हे तरुण चेहरे एकांकिकाविश्वातून पुढे आले आहेत. नाटक, एकांकिका करत आता टीव्ही इंडस्ट्रीत स्थिरावू पाहणाऱ्या या नव्या दमाच्या कलाकारांविषयी..



​अक्षया नाईक
​अक्षया नाईक

आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट सांगणारी 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका नुकतीच सुरू झाली असून, या मालिकेची नायिका अक्षया नाईक आहे. अभिनयाची आवड अक्षयाला लहानपणापासूनच होती. तेव्हापासून ती अभिनयाचे धडे घेत आहे. बालनाट्यापासून ते चित्रपटापर्यंत सर्व माध्यमात तिनं काम केलं असून, २००४ ला आलेल्या 'अकल्पित' या चित्रपटात ती पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरी गेली होती. 'खामोश अदालत जारी है', 'लव्ह गोज बियाँड टर्म्स', 'डार्क रूम प्रोजेक्ट', 'द प्रपोजल', 'द अनटायटल्ट' या हिंदी आणि इंग्लिश नाटकांमध्ये तिनं काम केलं असून, २०१४ ला रुईया कॉलेजमधून तिनं केलेली 'ब्रेन' ही एकांकिका युथ फेस्टिव्हलमध्ये गाजली होती.

माझी आणि अभिनयाची गाठ लहानपणीच बांधली गेली होती. बालनाट्य, एकांकिका, चित्रपट हे सगळंच करत मालिकांमध्ये छोट्या भूमिकासुद्धा केल्या. मुख्य भूमिकेत काम करता यावं यासाठी वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत होते. पण माझ्याबरोबर असणाऱ्या प्रत्येकानं मला सांगितलं, की मी जशी आहे तसंच राहावं. कारण ती माझी ओळख आहे. त्यामुळेच मला ही मालिका करता येतेय.

-अक्षया नाईक



​दीपाली जाधव
​दीपाली जाधव

'देवमाणूस'मधील रुपाली हे पात्र साकारणाऱ्या दीपालीनं बालनाट्यापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. शारदाश्रम शाळेतून तिने पाचवीला असताना बालनाट्यात काम केलं होतं. तेव्हापासून तिला अभिनयाची आणि नाटकाची ओढ लागली. सुरुप्रवाह या हौशी नाट्यसंस्थेतून तिनं नंतर एकांकिका, नाटक सुरू ठेवलं. नाटक, एकांकिका करत असताना तिनं 'व्हॉट अबाउट सावरकर' हा चित्रपट केला. नंतर अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका तिनं केल्या. नाटकांची ओढ असल्यामुळे तिने सुरुप्रवाह या संस्थेतून राज्यनाट्य स्पर्धेत अनेक नाटकं केली आहेत.

शारदाश्रममध्ये असताना मी बालनाट्यं करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकांकिका, नाटक, बालनाट्य करण्याची ओढ लागली. म्हणून सुरुप्रवाह या संस्थेतून अनेक नाटकं-एकांकिकांतून मी काम केलं. हे काम करत असताना रंगभूमीशी जोडून राहिल्यामुळे मला चांगले अनुभव आले. रंगभूमीशी प्रामाणिक राहिल्यामुळेच मी प्रेक्षकांसाठी विविध माध्यमांत काम करतेय.



धीरज कांबळे
धीरज कांबळे

आयएनटीत सादर झालेल्या 'ठसका' ही धीरजची पहिली एकांकिका. कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या धीरजचं नाव पुढे वर्षभर चर्चेत राहिलं. धीरजनं साकारलेल्या 'दिनू' या पात्रानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलंच. शिवाय, आणखी अनेक कलाकारांनीही त्याचं कौतुक केलं. आयएनटीनंतर समीर चौगुले या अभिनेत्यानं त्याला भेटून त्याच्या कामाची प्रशंसा केली. या एकांकिकेनंतर धीरज 'माझा होशील ना' या मालिकेतून प्रेक्षकांना दिसतो आहे. मालिकेत त्याचं पात्र दिसत आहे.

माझ्या पहिल्याच एकांकिकेनं मला सरळ मालिकेत काम मिळवून दिलं. हे सगळं अनपेक्षित घडलंय माझ्याबरोबर. मला वाटलंही नव्हतं की मला कधी मालिका करायला मिळेल. माझ्या कामाची पोचपावती यामुळे मिळाली आहे.



​शिवाली परब
​शिवाली परब

नृत्याच्या आवडीतून सीएचएम कॉलेजमधून युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेणारी शिवाली परब सध्या 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा'मधून महाराष्ट्राला हसवतेय. युथ फेस्टिव्हलपासून सवाई या सगळ्याच स्पर्धांमध्ये शिवाली गाजली आहे. 'उत्तुंग' या एकांकिका स्पर्धेत विभवांतर या एकांकिकेसाठी तिला आणि तिच्या सहकलाकारांना सगळ्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. आयएनटीमध्ये या एकांकिकेनं अनेक पारितोषिकांवर नाव कोरलं होतं. एका कार्यक्रमात स्किट करणाऱ्या शिवालीचं काम पाहून नम्रता आवटे या अभिनेत्रीनं तिला हास्यजत्रेसाठी बोलावलं. हास्यजत्रेच्या सर्वच हंगामांत शिवालीचा जोरदार अभिनय आपण पाहत आहोत. 'नम्रताताईनं दिलेल्या संधीमुळे मी आज संपूर्ण महाराष्ट्राला हसवू शकते. मी यासाठी आयुष्यभर तिची आभारी राहेन', असं शिवाली सांगते.

लावणी करायची म्हणून युथ फेस्टिव्हलच्या ग्रुपमध्ये आले आणि एकांकिका, स्किट सगळंच करू लागले. आमचे दिग्दर्शक सुनील हरिश्चचंद्र यांनी फार मेहनत करून आम्हा सगळ्यांना तयार केलं. प्रत्येक दिग्दर्शकानं मला काही ना काही शिकवलं आहे. त्यामुळेच मी आज इथवर पोहचू शकले.



​रोहन सुर्वे
​रोहन सुर्वे

एकांकिका, नाटक, लघुपट अशा अनेक माध्यमांमध्ये झळकणारा रोहन सुर्वे महर्षी दयानंद कॉलेजचा विद्यार्थी. एमडीच्या 'नाट्यागंण'मधून त्यानं काम केलेल्या 'दप्तर', 'झुला धीरे से झुलाओ', 'बत्ताशी' 'ब्रह्मास्त्र' तर मिथक मुंबईमधून त्यानं केलेली 'बेनिफिट ऑफ डाउट' या एकांकिकांमध्ये त्यानं केलेल्या भूमिका हिट ठरल्या. एकांकिकांपासून सुरुवात करत तो स्वतःसाठी संधी शोधत राहिला. नाटकांमधूनच अभिनेता घडतो, हा मंत्र लक्षात ठेवत नाटकाचा अभ्यास करत तो अभिनयाचे धडे घेत राहिला. 'गाव गाता गजाली'मध्ये मध्यवर्ती भूमिका केल्यानंतर त्यानं 'संगीत एकच प्याला' या नाटकातसुद्धा काम केलं आहे. 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत तो आता दिसणार आहे.

नाटक, एकांकिका करत मी स्वतःला अभिनयाचे धडे दिले. आमचं कॉलेज आमच्यासाठी नाटकांचं विद्यापीठ आहे, कारण अनेक जण इथे घडले आहेत. आता आम्हीसुद्धा आम्हाला घडवत आहोत. नाटक, मालिका आम्ही करतच राहू. पण, एकांकिका आणि नाट्यांगणमुळे आमचा पाया भक्कम झालाय हे आम्ही कधीही विसरणार नाही.



​पूर्वा कौशिक - फडके
​पूर्वा कौशिक - फडके

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील 'आरती' ही भूमिका साकारणारी कलाकार म्हणजे पूर्वा कौशिक - फडके. सीएचएम कॉलेजमधून अभिनयाला सुरुवात केलेल्या पूर्वाची 'ही वस्ती सस्ती' ही पहिली एकांकिका. सीएचएममध्ये असताना अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये तिनं काम केलं आहे. 'फ्रेशर' या सीरिअलसाठी गुजराती बोलता येणाऱ्या तरुणीची गरज असताना, पूर्वाला गुजराती येत या गैरसमजातून तिची निवड झाली. पण, तिला जेव्हा कळलं की तिला गुजराती बोलायचं आहे, त्यावेळी तिनं दिग्दर्शकाला स्पष्ट सांगितलं की तिला गुजराती येत नाही. नंतर तिनं त्या पूर्ण मालिकेमध्ये मराठी-गुजराती असलेलं पात्र साकारलं. लॉकडाउनपूर्वी 'डोन्ट वरी हो जायेगा' हे तिचं नाटक गाजत होतं. नाटकासाठी तिला अनेक पुरस्कार सोहळ्यांत नामांकन मिळालं आहे. गेल्या वर्षी आलेल्या 'साथ दे तू मला' या मालिकेतसुद्धा तिनं मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

एकांकिका स्पर्धा, नाटक यातून आम्ही कलाकार घडलो आहोत. नाटकानं जो पाया आमचा भक्कम केलाय, त्यासाठी रंगभूमीचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. मालिकेतून छोट्या-मोठ्या भूमिका करणं, नाटक, एकांकिका करणं हे करत राहू.





from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32x7guR