Full Width(True/False)

भविष्य ओटीटी, पण सिनेमांचं स्थान कायम: कोठारे

मुंबई टाइम्स टीम गेली अनेक वर्षं 'धूमधडाक्यात' एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कोठारे यांनी मालिकाविश्वातही आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये जुन्या आठवणींना तर उजळा मिळालाच. पण, या बाप-लेकाच्या जोडीमध्ये असलेले घट्ट बंध, कुटुंबावर असलेलं प्रचंड प्रेम, कामाप्रती असलेली निष्ठा, रसिकांचं मिळालेलं प्रेम अशा अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. '' या नव्याकोऱ्या मालिकेसह यापूर्वी केलेल्या 'विठूमाऊली', 'गणपती बाप्पा मोरया', 'जय मल्हार' या मालिकांविषयीही ते बोलते झाले. लॉकडाउनमध्ये मिळालेला मोकळा वेळ कसा गेला? हे सांगत गप्पांना सुरुवात झाली. लॉकडाउनचा वेळ लॉकडाउन काळात कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवायला मिळाल्याबद्दल आदिनाथनं सांगितलं की, 'मी आणि डॅड खूप भांडतो, तितकीच मजाही करतो. खरं म्हणजे जिजा असल्यानं आमचं छान मनोरंजन होत होतं. त्यामुळे लॉकडाउनचा काळ कसा गेला ते कळलंच नाही.' लॉकडाउनच्या काळाबद्दल म्हणाले की, 'जिजाशी खेळण्याबरोबरच आमची कामंसुद्धा सुरू होती. त्यामुळे ऑनलाइन मीटिंग्ज, चर्चा हे सगळं सुरू होतं. सर्जनशील कामासाठी खूप चांगला वेळ मिळाला. कौटुंबिक वेळ म्हणजे आम्ही रोज एकत्र बसून एक चित्रपट पाहायचो.' आदिनाथही माझ्यासारखाच 'आदिनाथ लहान असल्यापासून मी त्याच्याशी वडीलांसारखा कधीच वागलो नाही. कायम मोठ्या भावासारखा त्याच्याशी भांडत आलोय. चुकलो की एकमेकांना सॉरी म्हणतो. आदिनाथही जिजाशी असाच वागतो. आई-बाबा एखादी गोष्ट करून देत नसतील, तर ती माझ्याजवळ येते आणि माझ्याकडून पूर्ण करून घेते', असं महेश म्हणाले. पौराणिक विषय सिनेमात दाखवणं कठीण मालिकांमध्ये दिसणारे पौराणिक विषय मोठ्या पडद्यावर आणावेत असं कधी वाटलं नाही का? या प्रश्नावर महेश कोठारे यांनी सांगितलं की, 'पौराणिक विषय मांडायचा, तर त्यासाठी किमान दोन वर्षं तरी वेळ हवा. अडीच तासांच्या सिनेमात एखाद्या महान पौराणिक पात्राचं संपूर्ण जीवन बसवणं कठीण आहे.' तर आदिनाथनं, 'यावर चित्रपट करायचा तर आर्थिक मर्यादा खूप येतात. पौराणिक विषयांचा आवाका, गोष्टी मोठ्या असल्यानं तिथे लागणारं अर्थकारणही वेगळं असते. असा विषय मांडणं ही जोखीम असते', असं मत मांडलं. पौराणिक मालिका करताना काय काळजी घ्यावी लागते? असं विचारलं असता आदिनाथ म्हणाला, की, 'पौराणिक मालिका सादर करत असताना प्रचंड अभ्यास, दांडगं संशोधन, भव्यदिव्य सेट या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मालिकेची मांडणी व्यवस्थित करावी लागते. प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत, त्या सांभाळत मालिकेचं कथानक रंजकपणे पुढे घेऊन जावे लागतं.' हे भविष्य? सध्या सगळीकडे ओटीटी माध्यमाची चर्चा रंगतेय. यापुढे हेच मनोरंजन क्षेत्राचं भविष्य असेल का? या प्रश्नावर आदिनाथ म्हणाला की, 'ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना आवडणारा आशय येत असल्यानं तो भविष्य ठरू शकतो. घरबसल्या मनोरंजनासाठी सगळेच तयार असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणायचं असेल, तर तसे दर्जेदार तयार करण्याची गरज आहे.' तर महेश कोठारे यांनी चित्रपटांना पर्याय नाही असं सांगत, एखादा विषय पोहोचवायचा तर चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. लक्ष्याची आठवण अनेक वाचकांनी कमेंट्समधून महेश यांना, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या मैत्रीबद्दल विचारलं. तेव्हा महेश म्हणाले की, 'लक्ष्मीकांत माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये असायचाच. अचानक तो आपल्याला सोडून गेला याचं दु:ख आहे. पण, मला असं जाणवत राहतं की लक्ष्या अजूनही माझ्याबरोबर आहे. तो आहे ही भावना मला अजून काम करण्याची प्रेरणा देते.' आदिनाथबरोबर कुणाची जोडी? महेश-लक्ष्या ही जशी हिट जोडी होती, तशी आदिनाथबरोबर कुणाची जोडी व्हावी असं वाटतं? असा प्रश्न विचारल्यावर महेश म्हणाले की, 'आदिनाथला जोडीची गरज नाही. तो स्वत: सक्षम आहे. तो एक समर्पित आणि झोकून देऊन काम करणारा अभिनेता आहे. माझ्या दिग्दर्शनाखाली त्यानं काम केल्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो. व्यक्तिरेखेनुरूप तो प्रामाणिकपणे स्वत:मध्ये बदल करत असतो. दिग्दर्शक म्हणूनही तो तितकाच उत्तम आहे. आपलं अष्टपैलुत्व त्यानं वेळोवेळी सिद्ध केलं आहे.' महेश कोठारे अभिनेते म्हणून तुझ्या दिग्दर्शनाखाली कधी पाहायला मिळणार? या प्रश्नावर, 'लवकरच' असं उत्तर आदिनाथनं दिलं. नव्या कलाकारांना संधी निर्माते म्हणून महेश कोठारे नेहमी नव्या चेहऱ्यांना संधी देत असतात. याबद्दल ते म्हणाले की, 'नवी पिढी खूप हुशार आहे हे त्यांच्या ऑडीशन्स बघताना जाणवतं. ही नवी मुलं कोऱ्या पाटीसारखी असतात. त्यांना शिकण्याची इच्छा असते. उत्सुकता, ओढ असते. त्यांच्याबरोबर काम करताना कायम मजा येते.' ज्योतिबासाठी ऑनलाइन ५५० ते ६०० ऑडीशन्स घेण्यात आल्या होत्या. अखेर विशाल निकम या नव्या चेहऱ्याची निवड झाली. आदिनाथ म्हणाला की, 'नव्या मुलांमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांना संधी मिळाली, तर ते त्याचं सोनं करतात.' कोल्हापूर कर्मभूमी 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सुरू आहे. कोल्हापूरबद्दल महेश म्हणाले की, 'कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कोल्हापूरमध्ये काम करण्याचा आनंद वेगळा आहे. मी चित्रनगरीमध्ये गेल्यावर माझ्या आणि लक्ष्याच्या 'झपाटलेला' चित्रपटाच्या आठवणी जाग्या झाल्या. कोल्हापूर सुंदर आहे, त्याचबरोबर इथली माणसंसुद्धा प्रेमळ आणि निरागस असल्यानं इथे काम करताना मजा येते.' घराणेशाहीचा अनुभव नाही चित्रपटसृष्टीत वादाचा मुद्दा ठरतोय तो घराणेशाहीचा. याविषयी आपलं मत व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले की, 'इतक्या वर्षांत मला तरी याचा अनुभव आलेला नाही. या क्षेत्रात ये, असं मी आदिनाथलाही कधी सांगितलं नव्हतं. एमबीए झाल्यानंतर त्याचा त्यानंच हा निर्णय घेतला. या क्षेत्रात आल्यानंतर त्यानंही ऑडीशन दिल्या आणि चित्रपट मिळवले. मी कधीही त्याच्या करिअरमध्ये आलो नाही.' तर आदिनाथ म्हणाला की,'तुम्ही कुणाचा मुलगा-नातू असलात, तरी तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तरच लोक सतत तुमचे चित्रपट बघायला येतात. त्यामुळे रसिकांचं प्रेम तुम्हाला मिळवावं लागतं.' रसिकांचं प्रेमच सर्व काही फेसबुक लाइव्ह सुरू असताना अनेकांनी, महेश आणि आदिनाथ यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याविषयी महेश कोठारे म्हणाले की 'रसिकांच्या प्रेमामुळे आजवर एवढं काम करू शकलो आहे. रसिकांना कायम काहीतरी वेगळं काहीतरी देण्याचा ध्यास असतो. त्यामुळे जे काम मी करतो ते प्रेमानं, निष्ठेनं करतो. म्हणूनच रसिकांचं प्रेम आजवर लाभलं आहे. रसिकांमुळे माझ्यातली सकारात्मक ऊर्जा टीममध्ये मला देता येते. असंच प्रेम आणि विश्वास कायम असू द्या.' संकलन : गौरी भिडे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2G8KYai