म. टा. प्रतिनिधी, पुणे नृत्य कलाकार (वय २४) हिने आर्थिक परिस्थितीला कंटाळून मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या पश्चात दिव्यांग आई- वडील तसेच लहान बहीण नृत्य कलाकार प्रियांका काळे असा परिवार आहे. करोनामुळे सहा महिन्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. कुठलेच काम नसल्याने कलाकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. या तणावातून विशाखाने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 'महाराष्ट्राची गौरव गाथा', ' गर्जा' या कार्यक्रमांमध्ये दोघी बहिणी काम करत होत्या. विशाखा हिने 'जिजाऊ' मालिकेत छोटी भूमिका केली होती. 'विशाखाचा वर्षापूर्वी अपघात झाला होता. चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये खर्च आला होता. तेव्हा जवळचे पैसे संपले. नंतर करोनामुळे उत्पन्न थांबले. आम्ही दोघीच घर चालवत होतो. कार्यक्रम बंद झाल्यामुळे घराचे भाडे कसे द्यायचे, हा प्रश्न आम्हा दोघींना भेडसावू लागला. जून महिन्यात मी आजारी पडले. विशाखा या तणावात होती,' असे प्रियांका हिने सांगितले. ' मंगळवारी मी दुपारी घरी गेले. विशाखाने मला चहा दिला. वस्तूंची खरेदी करून ये असे ती म्हणाली. घरी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशाखाने आई-वडिलांचा विचार करायला हवा होता,' असे प्रियांका म्हणाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36FjgwP