Full Width(True/False)

सिनेरिव्ह्यू- अपुरी 'छलांग'

कल्पेशराज कुबल kalpeshraj.kubal@timesgroup.com शिक्षणाचं महत्त्व लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. आपल्याला नेहमी शिकवलं जायचं की, 'पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे खराब'. पण, मग हळहळू मानसिकता बदलू लागली. पालकांची विचारसरणी बदलली. उपरोक्त याच म्हणीचा आधार घेत 'छलांग' चित्रपटाची सुरुवात होते. दिग्दर्शक हन्सल मेहतासारख्या जाणकार दिग्दर्शकाचा हा सिनेमा असल्यानं, त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, ही 'छलांग' फार लांबपर्यंत जाऊ शकलेली नाही. कलाकरांनी आपल्या परीनं उत्तम कामगिरी केली आहे. परंतु, कथानक पटकथेच्या रुपात पडद्यावर मांडताना सादरीकरणाची दृष्टी कमी पडल्याचं जाणवतं. संकलनानंदेखील चित्रपटाला योग्य तसा न्याय दिलेला नाही. परिणामी ही, 'छलांग' प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरते. चित्रपटाच्या शेवटी, चित्रपटातून काय सांगायचं आहे? कोणता सामाजिक संदेश द्यायचा आहे? हे सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचतं खरं. परंतु, ती मांडण्याची पद्धत नायकाच्या तोंडी असलेल्या एका मोठ्या स्वगताच्या (मोनोलॉग) स्वरुपात आहे. त्यामुळे, जर सामाजिक संदेशच ऐकायचा आहे. तर चित्रपटाचा केवळ शेवटच बघितलेला बरा असं वाटून जात. सिनेमाच्या ट्रेलरवरून तो 'स्पोर्ट्स ड्रामा' दिसतो. पण, सिनेमात फार 'स्पोर्ट्स'ही नाही आणि रंजन करणारा 'ड्रामा'ही दूरदूरपर्यंत कुठेही नाही. चित्रपटातील नायकच जिंकणार आहे हे आपण कायम गृहीत धरलेलं असतं. पण, या विजयापर्यंत पोहोचण्यामध्ये येणारे चढ-उतार, त्यातला संघर्ष आपल्याला अपेक्षित असतो. त्या खडतर मार्गाचं दर्शन आपल्याला चित्रपटात होत नाही. केवळ जाणीवपूर्वक मुद्दाम एकामागोमाग घटना, सीन, दृश्यं कथानकाची लांबी वाढवण्यासाठी घडवल्या गेल्या आहेत की काय? असा प्रश्न पडतो. 'पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे लाजवाब' ही नवी म्हण शिकवण्याचा प्रयत्न सिनेमा आपल्याला करतो. 'आपल्या देशातील प्रत्येकाला आपला मुलगा किंवा मुलगी सचिन तेंडुलकर आणि मुलगी सायना नेहवाल व्हावी अशी इच्छा असते. पण, कोणालाही सचिन आणि सायनाचे आई-वडील व्हायचे नसते.' हाच दृष्टिकोन चित्रपट आपल्या देतो. (शेवटच्या काही दृश्यांमध्ये.) 'छलांग'ची गोष्ट एक युवा पीटी शिक्षकावर बेतलेली आहे. महिंदर सिंह उर्फ माँटू () थोडा आळशी आहे, थोडा कामचोर आहे. पीटीचा शिक्षक असूनदेखील सूर्य येतो, तेव्हा त्याची झोप पूर्ण होते. खेळ, व्यायाम यात त्याला फार रस नाही. वडिलांच्या शिफारशीमुळे त्याला शाळेत पीटी शिक्षकाची नोकरी लागली आहे. दुसरीकडे एका दाम्पत्याला माँटू त्याच्या तथाकथित 'मॉरल पुलिसिंग' करत त्रास देतो. पण, पुढे त्या दाम्पत्याला मुलीच्या (नीलिमा - ) प्रेमात तो पडतो. हे प्रेमप्रकरण पडद्यावर दाखवताना फार संदर्भांचं स्पष्टीकरण लेखक आणि दिग्दर्शकानं सिनेमात दिलेले नाही. कदाचित प्रेक्षकांना गृहीत धरुन कथानकात इकडून तिकडे दृश्यांनी 'छलांग' घेतली असावी. ही नीलिमादेखील कम्प्युटर शिक्षिका म्हणून त्याच शाळेत शिकवायला जाते, जिथे माँटू पीटीचा शिक्षक असतो. आता कथानकामध्ये येणारं नवीन वळण म्हणजे, जेव्हा शाळेत नवीन पीटी शिक्षक दाखल होतो. इंदर मोहन सिंह (जीशान अयूब) असं त्याचं नाव आहे. हा नवीन पीटी शिक्षक खरंच मेहनती आणि विद्यार्थ्यांना विविध खेळ, क्रीडा प्रकार शिकवण्यास पात्र आहे. आता अशी वेळ येते की, इंदर मोहन सिंह हा माँटूकडून त्याची नोकरी आणि छोकरी दोन्ही हिसकावून घेऊ बघतोय. इकडे माँटूचा स्वाभिमान दुखावतो. इंदर आणि माँटूमध्ये क्रीडा स्पर्धा रंगते. आता या स्पर्धेत काय होतं? माँटूची नोकरी कायम राहते का? माँटू आणि नीलिमा एकत्र येतात का? नव्या सिंह सरांचं पुढे काय होतं? हे सर्व जाणून घेण्यासाठी एखाद वेळेस हा चित्रपट पाहायला हरकत नाही. बाकी राजकुमार राव, नुसरत भरूचा, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ शुक्ला, ईला अरूण आदी सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत. पण, त्यात दिग्दर्शकीय संस्कार फार दिसत नाहीत. सिनेमाची उजवी बाजू म्हणजे सिनेमातील गाणी. ती श्रवणीय आणि दिसायला झगमगीत झाली आहेत. सिनेमा : छलांग दिग्दर्शक : हंसल मेहता लेखन : लव रंजन, असीम अरोरा, जीशान कादरी कलाकार : राजकुमार राव, नुसरत भरूचा, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ शुक्ला, ईला अरूण संगीत : हितेश सोनिक, गुरु रंधावा, यो यो हनी सिंग, विशाल शेखर छायांकन : इशिता नारायण संकलन : ऐकीव अली, चेतन सोलंकी ओटीटी : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ दर्जा : दोन


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35GwE2M