Full Width(True/False)

मॅडम चीफ मिनिस्टर: खुर्चीसाठी धूर्त राजकारण

असं म्हणतात की, 'राजकारणात जे काही चाललंय, चालल्यासारखं वाटतंय किंवा जे काही चालेल असं वाटतं; याची कोणीही कल्पना करु शकत नाही. सत्तेचं राजकारण कधी सरळमार्गी नसतंच, त्यात कधी?, का?, कशी? अशी नागमोडी वळणे येतील किंवा येणारही नाहीत याबाबत खुद्द राजकारणीही अनभिज्ञ असतात. म्हणूनच तर 'खुर्ची'साठी अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि त्याहून पुढे परदेशात देखील गोंधळ होतो. हा गोंधळ कधी शाब्दिक असतो तर कधी खुनाच्या रक्त्तानं माखलेला असतो. पण, या कानाची त्या कानाला खबर लागत नाही. राजकारणातील ही देखी-अनदेखी बाजू दिग्दर्शक सुभाष कपूरनं त्यांच्या 'मॅडम चीफ मिनिस्टर' सिनेमात मांडली आहे. 'प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं' हे वाक्य आपल्याकडे सर्वांचं परिचित आहे. याच वाक्याचा दृष्टांत आपल्याला या सिनेमात दिसतो. इकडे 'प्रेम' ही आहे आणि राजकारणरुपी 'युद्ध' देखील. व्यवस्थेभोवती फिरणारी कथा आणि त्यालाच जोडून असलेल्या पटकथेतील दृश्य यांचं सादरीकरण म्हणजे दिग्दर्शक सुभाष कपूरचा हातखंडा आहे. चित्रपटातील ते प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असतात. असाच प्रयत्न यावेळी 'मॅडम चीफ मिनिस्टर'च्या माध्यमातून केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडणारी ही कथा आहे. गावातील वरिष्ठ जातीतील एक व्यक्ती त्याच्या घरासमोरून जाणाऱ्या दुसऱ्या जातीतील लग्न मिरवणुकीत सर्रास गोळीबार करतो. त्यात एका व्यक्तीला विनाकारण आपले प्राण गमवावे लागतात. सिनेमाची मुख्य गोष्ट तारा () या तरुणीभोवती फिरणारी आहे. ही त्याच व्यक्तीची मुलगी आहे; ज्याचा प्राण एका जातीवाद बंदुकीच्या गोळीने घेतलेला असतो. घरात पुन्हा मुलगी जन्माला आली म्हणून ताराची आजी तिला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करत असते. पण, ताराची आई तिला वाचवते. हीच मुलगी राजकारणात उतरल्यावर काय तांडव घालते; हे सगळं सिनेमात दाखवलं आहे. अन्यायग्रस्त तारा मुख्यमंत्रीच्या खुर्चीपर्यंत कशी पोहोचते? पोहोचल्यावर ती टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या थराला जाते? पण, सोबतच जनहिताचं आणि जनकल्याणाचं काम कसं करते? आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड कसा घेते? या सगळ्याची उत्तर 'मॅडम चीफ मिनिस्टर'मध्ये आहे. सिनेमात दिग्दर्शकानं तमाम राजकारणी मंडळींना बारीक मार्मिक चिमटे देखील काढले आहेत. युती, सत्ता खांदेपालट, सत्तेतील मंत्रीपदांचं निकटवर्तीय आणि कौटुंबिक व्यक्तींमध्ये वाटप, एकमेकांचे आमदार फोडण्याचे राजकारण; ते अगदी खुर्चीच्या मार्गात येणाऱ्याला ठार मारण्यापर्यंत... सर्व बाबींवर दिग्दर्शकानं भाष्य केले आहे. या सगळ्याला दमदार साथ मिळाली आहे ती; रिचा चड्ढाच्या अभिनयाची. ताराच्या भूमिकेत असलेल्या रिचानं स्वतःला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलंय. स्वतःच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेची व्यक्तिरेखा साकारताना रिचानं कुठेही दिखावेपणा न आणता अधिकाधिक सटल आणि नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. रिचाच्या तोंडी असलेला उत्तर प्रदेशी लहेचा भूमिकेत अजून जान ओततो. सिनेमा जसजसा शेवटाकडे जातो; तसं रिचाच्या भूमिकेतील मुरलेला राजकारणी आपल्यासमोर येतो. सिनेमाचा शेवट अनपेक्षित आणि भुवया उंचावणारा आहे. त्यामुळे खुर्चीसाठी केलेलं हे धूर्त राजकारण पाहण्यासाठी सिनेमा नक्कीच बघायला हवा. , , , यांनीही सुरेख काम केलंय. तांत्रिक पातळीवर देखील उत्तम काम झालं आहे. पूर्वार्ध संकलनात अधिकच कात्री मारलेला जाणवतो. पण, तो मुख्य कथेला इजा करत नाही. छायांकनाच्या बाबतीत देखील सिनेमा 'बर्ड आय व्ह्यु'पासून पॅनरोमापर्यंत सर्व काही पडद्याच्या चौकटीत दाखवण्याचा प्रयत्न करतो. सिनेमा : मॅडम चीफ मिनिस्टर निर्माते : भूषण कुमार, क्रिष्णा कुमार, नरेन कुमार, डिंपल खारबंदा कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन : सुभाष कपूर कलाकार : रिचा चड्ढा, मानव कौल, अक्षय ओबरॉय, सौरभ शुक्ला, निखिल विजय संगीत : मंगेश धाकडे छायांकन : जयेश नायर संकलन : चंद्रशेखर प्रजापती दर्जा : तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Mgprit