मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहरनं १५ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संदीपनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यानं त्याची पत्नी कंचन शर्मामुळे मानसिक तणावात असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं म्हटलं होतं. संदीप नाहरच्या आत्महत्येनंतर गोरेगांव पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्याची पत्नी कंचन शर्मानं एका कारपेंटरच्या मदतीनं त्याच्या रुमचा दरवाजा तोडला होता. ती संदीपला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेली होती. मात्र त्याठिकाणी त्याला हॉस्पिटलध्ये भरती करण्यास नकार देण्यात आला. जेव्हा ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केल्यानंतर त्याची पत्नी कंचन शर्मानं त्याचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर पोलिसांनी संदीपच्या मृतदेहाची पाहणी करून तो ताब्यात घेतला. पोलिसांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्याच्या गळ्यावर संशयास्पद व्रण दिसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून ज्यात मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेता येईल. सायबर सेलकडूनही तपास सुरू अभिनेता संदीप नाहरनं आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर एक मोठा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यानं पत्नी कंचन शर्मासोबतच्या नात्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांचं नातं कशाप्रकारे बिघडलं आहे आणि त्याचा त्याला कशाप्रकारे मानसिक त्रास होत आहे हे देखील त्यानं या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. संदीपच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या खासगी जीवनही अतिशय तणावपूर्ण होतं. त्यामुळे आता मुंबई पोलीसांची सायबर सेल संदीपच्या सोशल मीडिया अकाउंटचा तपास करत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZhoN7M