मुंबई- मागील काही दिवसांत अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली. अनेक चित्रपटांचे पोस्टर्स आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. नुकताच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नेहवालच्या आयुष्यावर आधारीत असलेला 'सायना' या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला. हा पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. चित्रपटावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले. तसंच नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. या ट्रोलिंगला चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आता उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ट्रोलर्सचा खरमरीत शब्दात समाचार घेतला आहे. 'सायना' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हातात तिरंग्याचा रिस्टबॅण्ड घातलेल्या मुलीचा हात दाखवला आहे आणि सोबत वर उडणारं सायना नावाचं शटल दाखवण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टरचा अर्थ ते शटल हवेत सर्व्हिस करण्यासाठी उडवण्यात आलं असा घेतला. त्यावरून युजर्सनी पोस्टरला ट्रोल केलं. बॅडमिंटनमध्ये अशी सर्व्हिस केली जात नाही हे देखील माहीत नाही का? हा सायना नेहवालचा बायोपिक आहे की सानिया मिर्झाचा? असे एकना अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आता उत्तरं दिली आहेत. दिग्दर्शक अमोल कोल्हे यांनी ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी लिहिलं, 'चित्रपटाच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा केली जातेय. टेनिसची सर्व्हिस करत आहात का, सायना आहे कि सानिया.. असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जर सायना नावाचं शटल हवेत उडतंय तर हातात तिरंग्याचा रिस्टबॅन्ड घातलेली भारतीय मुलगी ते शटल पकडण्याचा प्रयत्न करतेय म्हणजे ती सायनाच्या इतकीच मोठी होण्याची स्वप्न बघतेय. हे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायक असलेलं पोस्टर राहुल नंदा यांच्या कल्पनेतून तयार करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने त्याचा अर्थ असा समजावून सांगावा लागतोय. ते पण अशा व्यक्तींना ज्या काहीही बोलण्यापूर्वी अजिबात विचार करत नाहीत. विचार करा!!' अशी पोस्ट करत अमोल यांनी ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. हा चित्रपट २६ मार्च २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uXUFgr