मुंबई- करोनानंतर मराठी चित्रपटसृष्टीदेखील जोमाने कामाला लागली आहे. चित्रपटांबाबत निरनिराळे प्रयोग केले जातायत. मराठीमधील लोकप्रिय अभिनेता याची मुख्य भूमिका असलेला 'गोदावरी' हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती खुद्द जितेंद्र जोशी याने केली असून 'पुणे ५२' सारख्या दर्जेदार चित्रपटातून लक्ष वेधून घेणारा दिग्दर्शक निखिल महाजन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशीसोबत गौरी नलावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३० एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी "गोदावरी"ची निर्मिती केली असून पवन मालू, मिताली जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर आकाश पेंढारकर, पराग मेहता हे सहनिर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. १ जानेवारी रोजी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. टीजरच्या शेवटी चित्रपटाच्या प्रदर्शनबाबत घोषणा करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा आठवण करून देतो म्हणत चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. चित्रपटाची कथा निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांची असून संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. महत्वाचं म्हणजे चित्रपटातील गाणी जितेंद्र जोशीने लिहिली असून त्यांना ए. व्ही. प्रफुलचंद्र यांचं संगीत आहे. एका सामान्य घरातील एकत्र कुटुंबाची ही कथा असून एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं जितेंद्रने चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं. अनेक दिग्गज कलाकार असणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3v4RByS