मुंबई: टीव्ही मालिकांपेक्षा रिअलिटी शोकडे प्रेक्षकांचा नेहमीच जास्त कल असलेला पाहायला मिळतो. सध्या टीव्हीवर वेगवेगळे डान्स आणि सिंगिग रिअलिटी शो सुरू आहेत. पण यातही इंडियन आयडल या शोला प्रेक्षकांची पसंती नेहमीच जास्त असलेली पाहायला मिळते. टीआरपीच्या बाबतीतही हा शो नेहमीच सर्वात पुढे असतो. पण मागच्या काही दिवसांपासून हा शो बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. इंडियन आयडल या शोला नेहमीच चांगला TRP मिळाला आहे. पण यंदाच्या सीझनमध्ये मात्र हे गणित थोडं बिघडलेलं दिसत आहे. १२ सीझनमध्ये चांगले स्पर्धक असूनही हा शो TRP च्या स्पर्धेत खूपच मागे आहे. त्यामुळेच हा शो लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. पण आता यावर गायक आणि या शोचा परीक्षक हिमेश रेशमियानं मौन सोडलं आहे. काही दिवसांपूर्वी सुपर डान्सर हा शो इंडियन आयडलला रिप्लेस करणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता यावर प्रतिक्रिया देताना हिमेश रेशमियानं या सर्व केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तो म्हणाला, 'सुपर डान्सर हा शो रिप्लेस करत आहे हे खरं असलं तरीही शो बंद होणार नाही. इंडियन आयडल नव्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. फक्त आता हा शो रात्री ९.३० वाजता सोनी टीव्हीवर पाहता येणार आहे.' हिमेश रेशमियानं शो बंद होत नसल्याचं स्पष्ट करत नव्या वेळेचीही माहिती दिली. त्यानुसार शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सर हा शो रात्री ८ वाजता आणि त्यानंतर ९.३० वाजता इंडियन आयडलचं प्रसारण केलं जाणार आहे. या शोबद्दल बोलायचं तर या शोमध्ये या सीझनमध्ये एका पेक्षा एक टॅलेन्टेड स्पर्धक आहेत आणि हा सीझनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cdnmNS