Full Width(True/False)

'रिकामी घरं करोना रुग्णांच्या मदतीसाठी द्या', भरत जाधवांची युक्ती

मुंबई- महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. प्रत्येकजण घाबरला आहे. स्वतःची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यावर आपला जास्त भर असतो. पण त्यासोबतच आपण या समाजाचंदेखील देणं लागतो. करोनाच्या या भयावह परिस्थितीत समाजाप्रती आपला खारीचा वाटा उचलण्याचं आवाहन अभिनेते यांनी केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपण आपल्या परीने रुग्णांची कशी मदत करू शकतो याचं उदाहरण दिलं आहे. सोशल मीडियावरील पोस्ट वाचून भरत यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये एक अनोखी कल्पना सत्यात उतरवली होती. तिच वापरून इतरांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. भरत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही संकल्पना सांगितली. त्यांनी लिहिलं, 'सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग सर्वांनी विचार करण्यासारखा आहे. माझ्या सोसायटीमध्ये चारजण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट वन बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा, औषधे देत होता.' 'रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्व जण बरे झाले. आता तेच फ्लॅट अडचणीच्या वेळेसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची.' भरत यांनी सांगितलेली ही कल्पना अनेकांना आवडली आहे. तर अनेक चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. जिथे बॉलिवूडमधील कलाकार स्वतःचा विचार करत बाहेरगावी जात आहेत तिथे मराठी कलाकार नेहमीच इतरांच्या मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3er020e