मुंबई टाइम्स टीम ० 'भोसले' या चित्रपटासाठी तुला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार इतर पुरस्कारांपेक्षा कसा वेगळा आहे?- देशातील सर्व सिनेमांचा विचार करणारा असा हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. माझ्या मनात त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण हा पुरस्कार आहे प्रादेशिक चित्रपटांना प्राधान्य देत त्यांना एक विशेष स्थान प्राप्त करून देतो. हे पुरस्कार मुख्य प्रवाहात किंवा व्यावसायिक पुरस्कारांपेक्षा बरेच वेगळे आहेत. ० लॉकडाउन आणि करोनाचा काळ किती आव्हानात्मक वाटतोय?- लोकांचा संयम संपला आहे. महिन्याचा पगार कुठून येणार, घरखर्च, कर्जाचा हप्ता भरायचा कसा; या सगळ्या प्रश्नांनी ते आता त्रस्त आहेत. कोणतीच कामं झाली नाहीत तर सगळंच कठीण होऊन बसेल. त्यातच करोनाची दुसरी लाट आली आहे. मोठ्या शहरांमध्ये त्याचा उद्रेक खूपच जास्त झाला आहे. सगळं ठीक होईल पण तोवर आपण संयम बाळगावा लागेल. ० ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यम हे मनोरंजनविश्वातील आशय कसं बदलतंय?- ओटीटी प्लेटफॉर्म आता सगळ्यांचं मनोरंजन करतंय. चित्रपटगृहं आणि इतर चित्रीकरण बंद आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र काहीसा समृद्ध आहे. ओटीटीवर जगभरातील चित्रपट, सीरिज प्रेक्षकांना कधीही बघता येतात. सर्व सामान्यांना आता ओटीटीची सवय झाली आहे. सध्या चित्रपटगृहं बंद आहेत. पण या कठीण काळानंतर त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. ० आपली व्यक्तिरेखा समजून घेण्याची प्रत्येक अभिनेत्याची आपापली पद्धत असते. तुझी पद्धत काय ?- मी अभिनय करायला सुरुवात केल्यापासून जगभरातील कलाकारांच्या कामाचं फार बारकाईनं निरीक्षण करतो. काम करण्याची माझी पद्धत एकसारखी कधीच नव्हती आणि नसेल. गरजेनुसार आपल्या अभ्यासपद्धतीत बदल केले तर आपल्याला अजून चांगलं शिकता येतं. अभिनय आणि आयुष्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. आयुष्याप्रमाणे अभिनयाच्या पद्धतीतही बदल होत आहेत. हे बदल करत राहणं ही अभिनेत्याची गरज असते. ० या क्षेत्रात येताना तू जे ठरवलेलं ते साध्य झालंय का?- मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा छोट्या भूमिकेशिवाय मला आणखी काही मिळेल अस मला वाटलंच नव्हतं. त्यावेळची आणि आताची मनोरंजनसृष्टी यामध्ये पुष्कळ फरक आहे. माझं स्वप्न होतं की मी अभिनय करत माझं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगू शकेन. हे स्वप्न फार पूर्वीच पूर्ण झालं. पण आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, अभिनेता म्हणून वाट्याला काय येणार आहे असे अनेक प्रश्न त्यावेळी पडायचे. आज, २६ वर्षांनंतर, मी असं म्हणू शकतो की माझ्याकडे चांगली कामं आहेत, लोक मला मोठ्या मानानं त्यांच्या कलाकृतीचा एक भाग बनवू इच्छितात. माझ्या स्वप्नापेक्षाही मला बरंच काही मिळालंय असं वाटतं. शब्दांकन : सुरज कांबळे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tLRfwi