मुंबई- देशात सुरू असलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने कित्येकांचे जीव घेतले आहेत. त्यात महाराष्ट्रसह अनेक राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा गरीब कामगारांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. या लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे बॉलिवूडमधील छोट्या कलाकारांना. हे कलाकार कॅमेराच्या मागे राहून काम करत असतात. परंतु, चित्रीकरण बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कलाकारांसाठी बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता पुढे सरसावला आहे. सलमानने या कलाकारांना ३ कोटी ७५ लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान लॉकडाउनच्या सुरुवातीपासूनच करोना योध्यांसाठी जेवणाची सोय करत आहे. आता सलमानने चित्रपटसृष्टीतील छोट्या छोट्या कलाकारांना मदत करायचं ठरवलं आहे. त्याने २५ हजार कलाकारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यात तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, स्टंटमॅन आणि स्पॉट बॉय यांचा समावेश आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने इंप्लॉइजच्या बी एन तिवारी यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तिवारी यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी सलमानला गरजू लोकांच्या नावांची एक यादी पाठवली आहे आणि तो गरजेनुसार रक्कम जमा करण्यासाठी तयार झाला आहे.' सलमानने मागील वर्षी सुरू झालेल्या लॉकडाउनमधेही गरीब मजुरांची मदत केली होती. सलमानने त्याच्या 'राधे' चित्रपटाच्या कमाईतून करोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानप्रमाणे यश राज फिल्म्स देखील गरजूंची मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यश राज यांनी ३० हजार जेष्ठ कलाकारांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कलाकारांना यश राज फिल्म्स तर्फे पाच हजार रुपये आणि महिन्याचा किराणा दिला जाईल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3y244Fp