- माई म्हणजे आमची आई. लहानपणी ती आम्हाला नेहमी म्हणायची, 'दीदीची चमची आशा आणि मीनाची चमची उषा.' मला कळायला लागल्यापासून माझ्यासमोर मीनाताई असे. माझ्याबरोबर भातुकली खेळणारी, माझ्यासाठी काही तरी शिवणारी, माझे लाड करणारी, माझ्यावर आईप्रमाणे माया करणारी मीनाताई, हे तिचं मी पाहिलेलं सगळ्यांत पहिलं आणि सुंदर रूप. मी लहानपणी तिला खूप त्रास दिला आहे; पण ती माझं सगळं प्रेमानं करायची. आमच्यामध्ये बहिणींपेक्षा मैत्रिणींचं नातं अधिक घट्ट आहे. कलावंत म्हणून मीनाताई खूप मोठी आहे. तिचा आवाज छान आहे. तिच्या आवाजाचा बाज शास्त्रीय संगीतातील असल्यामुळे रागदारी, ताना, आलाप ती उत्कृष्ट गायची. माझ्यापेक्षा ती फार सुरेल गाते. एक उत्तम संगीतकार म्हणून मी मीनाताईला फार मानते. तिच्या मुलांसाठी गाणी करण्याची वेळ आली, तेव्हा तिनं अनेक सुंदर बालगीतांची निर्मिती केली. बालगीतं ही लहान मुलांनीच त्यांच्या बोबड्या बोलात गावीत, असा तिचा हट्ट असे. मी त्यावेळी तिला विचारलंही होतं, की हे असं चुकीचं आणि बोबडं मराठी आवडेल का? मीनाताई ठामपणे म्हणाली, 'चॉकलेटचा बंगला, शाळेला सुट्टी, अभ्यास नको वगैरे हे लहान मुलांचंच भावविश्व आहे. त्यांच्याच त्या कल्पना आहेत. त्यांना जमेल तसं ते गाऊ दे.' बालगीतं मुलांच्याच आवाजात रेकॉर्ड केल्यानं, त्यांना अफाट यश मिळालं. केवळ मराठीतच नाही, तर हिंदी, गुजराती, बंगाली अशा विविध भाषांमध्येही तिनं बालगीतं रचली. आत्ताचा आघाडीचा गायक शान याच्याकडून बंगालीमधली आणि शिवांगी कपूर हिच्याकडून गुजराती भाषेतील बालगीतं तिनं गाऊन घेतली होती. गेली चार दशकं तिची सगळी बालगीतं प्रत्येक घरात वाजतात, पालकांना ती आपल्या मुलांना ऐकवावीशी वाटतात, याचं संपूर्ण श्रेय मीनाताईचं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पुढे 'माणसाला पंख असतात' या चित्रपटाला संगीत देताना, बाबांच्या एका चीजेवरून घेतलेलं 'ये जवळी घे' हे गाणं तिनं घाबरत घाबरत दीदीला ऐकवलं. दीदीला ते प्रचंड आवडलं आणि गाणं प्रसिद्ध झालं. आमच्या बाबांनी दीदीला जसं समोर बसवून शिकवलं, तसं मीनाताई कधी शिकण्यासाठी बसली नाही; पण बाबा शिकवत असताना तिथंच आजूबाजूला ती घुटमळत असायची. आम्ही बाकीचे खेळण्यात मग्न असायचो; पण मीनाताईनं बाबांनी शिकवलेलं सगळं मनात साठवून ठेवलं. आम्हा भावंडांच्या कोणाच्याही लक्षात नाहीत, अशा अनेक बंदीशी मीनाताईला अजूनही तोंडपाठ आहेत. बाबांच्या अनेक बंदीशींची तिनं आम्हाला आठवण करून दिली आणि त्या प्रचलित झाल्या आहेत. अगदी सहा-सात वर्षांपूर्वी मी तिला म्हटलं, की मला बाबांच्या चिजांची सीडी करायची आहे, तर तू रेकॉर्डिंग रूममध्ये जा आणि तुला आठवतील त्या बंदिशी गा. तिनं लागोपाठ वेगवेगळ्या रागातील २५ ते ३० चिजा आम्हाला म्हणून दाखवल्या. आजही आम्हाला कुणाला काही अडलं, तर तिला फोन करून विचारतो आणि तिच्याकडून उत्तर मिळतंच. मीनाताईचा स्वभाव शांत आणि बुजरा आहे. माझा स्वभाव जसा सगळ्यांमध्ये पटकन मिसळण्याचा आहे, तसा तिचा नाही. पुढे पुढे करणं तिला कधी जमलंच नाही. तिला अनोळखी लोकांमध्ये खुलेपणानं बोलायचं थोडं दडपण येतं. इतकी उत्तम गात असूनही तिनं कधी कुणाला गाण्यासाठी विचारलं नाही. वडिलांचा स्वाभिमानी स्वभाव आम्हा सगळ्या भावंडांच्या रक्तातूनच आला आहे. लाजाळू स्वभावामुळे मोजक्याच, जवळच्या लोकांमध्ये ती खूप छान बोलते. एखाद्या विषयावर भाषणही उत्तम देते. मीनाताईची हस्तकलादेखील छान आहे. ती सतत काही तरी कलात्मक गोष्टी बनवत असते. टोप्या, सांताक्लॉज, काचेच्या बॉक्समध्ये हिमालयाचा देखावा, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गोष्टी, बाहुल्या असं बरंच काही ती बनवत असते. मी तिनं बनवलेल्या अनेक गोष्टी जपून ठेवल्या आहेत. आम्ही दोघींनी मिळून खूप काम एकत्र केलं आहे. 'गोड तुझे नाम', 'रंग उषेचे', 'चल रे भोपळ्या', 'टोळ आणि मुंगी', 'तीन डुकरं' अशी रसिकांना भावणारी अनेक कामं आम्ही एकत्र केली. एकमेकींना विचारत, सल्लामसलत करत आमचं काम पूर्ण व्हायचं. वडील गेल्यानंतर दीदीलाही मीनाताईनं मोलाची साथ दिली. दीदी जिथं रेकॉर्डिंगला जाईल, तिथं मदतीला ती जायची. त्याचबरोबर माईला घरकामातही मदत करायची. स्वयंपाकात मदत करण्यापासून ते आम्हाला सांभाळण्यापर्यंत सगळ्या कामांत मीनाताईची मदत व्हायची. ज्यावेळी दीदी एकटीच मुंबईला आली, त्या वेळीही मीनाताईच तिच्याबरोबर होती. मीनाताई चांगलं लिहितेच; पण त्यापेक्षा तिचं वाचन अफाट आहे. वि. स. खांडेकर हे तिचे अत्यंत आवडते लेखक. त्यांनीच लिहिलेल्या 'माणसाला पंख असतात'मधील गाण्यांवर काम करायला मिळालं, तेव्हा तिला खूप आनंद झाला. लतादीदीच्या आयुष्यावर लिहिलेलं 'मोठी तिची सावली' हे पुस्तक तिच्यातल्या उत्कृष्ट लेखिकेचं उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठीही ती बुजऱ्या स्वभावामुळे आधी नाहीच म्हणत होती. मी आणि इतरांनी तिला समजावलं, की आम्ही सगळे त्या वेळेला लहान होतो. तुझ्याशिवाय आठवणी सांगणारं कोणीच नाही; त्यामुळे तू लिही. तुझ्याकडून सगळ्या आठवणी ऐकून आम्हाला पाठ झाल्या आहेत; पण आम्ही लिहिणं आणि तू लिहिणं यात फरक आहे. अनेक प्रयत्नांनंतर अखेर ते पुस्तक तयार झालं. कलाकार म्हणून मीनाताई जितकी महान आहे, तितकीच ती उत्तम गृहिणी आहे. तिनं तिचं घर, संसार उत्तम सांभाळला. नशिबानं तिला पती आणि सासर प्रेमळ मिळालं. आपल्या दोन्ही मुलांवर तिनं उत्तम संस्कार केले. लग्न होऊन जेव्हा ती सासरी गेली, तेव्हा मला करमायचं नाही. मग माझ्या तिच्या सासरी सारख्या फेऱ्या व्हायच्या. मीनाताई सगळा स्वयंपाक चविष्ट आणि रुचकर करते. तिच्या हातचे मांसाहारी पदार्थ दीदीसकट घरातल्या सगळ्यांना आवडतात. माझ्यामध्ये आणि मीनाताईमध्ये पदार्थांची सतत देवाणघेवाण सुरू असते. 'रेडिओ मिर्ची'नं मीनाताईच्या कार्याची दखल घेतली, याचा सगळ्यांत जास्त आनंद मला झाला; कारण तिचा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे. तिच्याजवळ इतके गुण असूनही, ती कधी कुणाला सांगायला जात नाही, ना त्याचं प्रदर्शन करते. लोक मला विचारतात, की मीनाताईनं या क्षेत्रात जास्त काम का केलं नाही? खरं म्हणजे, आम्ही लोकांनी केलेली गाणी गात बसलो. मीनाताईनं मात्र स्वत:चं अजरामर आणि वेगळं संगीतविश्व निर्माण केलं. मीनाताईची गाणी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंदित करू शकतात; त्याचबरोबर तिची गाणी डोक्यातून गेली, तरी कानात वाजत राहतात अशी आहेत. करोनामुळे आम्हाला तिला मिळालेल्या पुरस्काराचं जंगी सेलिब्रेशन करता आलेलं नाही; पण लवकरच घरातील सगळे आप्तस्वकीय एकत्र जमून तिचं अभिनंदन करू. आमची मीनाताई आता शांत जीवन जगते आहे. ती आजपर्यंत निरपेक्ष जीवन जगत आली आहे. तिनं कायम असंच सुखी राहावं. कुठल्याही गोष्टीचा हव्यास तिनं आणि आम्ही कुणीच केलेला नाही. या सगळ्या पुरस्कारांचा आनंद तर आहेच; पण रसिक श्रोत्यांनी छान म्हणणं हा आमच्या सगळ्यांसाठी कायमच सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे. मला माझ्या इतर थोरल्या बहिणींप्रमाणेच मीनाताईचा देखील प्रचंड अभिमान आहे. शब्दांकन : गौरी भिडे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Rny5yD