Full Width(True/False)

ओटीटीवरही आता वाट पाहा, सिनेप्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या

मुंबई टाइम्स टीम गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे सिनेमागृहं बंद झाली आणि बऱ्याचशा हिंदी चित्रपटांनी ओटीटीची (ओव्हर द टॉप) वाट धरली. चित्रपटगृहं नसल्याने बॉलिवूडला ओटीटीचा आधार वाटत होता. पण, करोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडचं ओटीटीवरील जहाजदेखील डगमगायला लागलंय. परिणामी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखादेखील लांबणीवर पडत आहेत. बरेच सिनेमे परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहून मगच प्रदर्शित करण्यात येणार आहेत. देशभरात सध्या लॉकडाउनची परिस्थिती आहे. मध्यंतरी काही काळ सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी पन्नास टक्के क्षमतेनं सुरू झाली होती. परंतु, आता करोनाचा कहर पुन्हा वाढल्यानं चित्रपटगृहांची दारं बंद करण्यात आली आहेत. काही राज्यं वगळल्यास महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक यासारख्या बहुतांश राज्यांमध्ये सिनेमागृहं बंद आहेत. गेल्या वर्षीदेखील देशव्यापी लॉकडाउनमध्ये अशीच परिस्थिती होती. पण, काही सिनेनिर्मात्यांनी त्यांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित केले. आताची परिस्थिती पाहता सिनेनिर्मात्यांना ओटीटीवरदेखील त्यांचे सिनेमे प्रदर्शित करायचे नाहीयत. सध्याच्या कठीण काळात प्रेक्षकांची मानसिकता पाहता त्यांनी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातंय. फरहान अख्तर अभिनित 'तूफान' हा सिनेमा यंदाच्या महिन्यातच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार होता. पण, आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. तसंच 'फॅमिली मॅन २'देखील मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण, तोदेखील जूनपर्यंत पुढे गेला आहे. पूर्वघोषित अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी येणार असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची संख्या कमी दिसतेय. 'राधे' येतोय म्हणून? सलमान खानचा गेल्या वर्षीपासून प्रदर्शनासाठी रखडलेला 'राधे' हा चित्रपट सिनेमागृहांत आणि ओटीटीवर एकाच वेळी प्रदर्शित होतोय. ओटीटीवर प्रदर्शित होताना तो 'पे पर व्ह्यू' संकल्पनेत प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना सिनेमांचं डिजिटल तिकीट खरेदी करून डिजिटली हा सिनेमा एकदाच पाहता येणार आहे. एका चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं जातं आणि त्याच वेळी दुसरा एक सिनेमा दोन्ही माध्यमात प्रदर्शित होण्यासाठी मोर्चेबांधणी करतो. याविषयी अधिक माहिती देताना ट्रेंड अॅनालिस्ट गिरीश जोहर सांगतात, 'गेल्या वर्षी सलमान खाननं जाहीर केलं होतं की, तो त्याचा सिनेमा सिनेमागृहांत प्रदर्शित करणार. तेव्हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. कारण, देशभरातील सर्व सिनेमागृहं बंद होती. पण, आता चित्रपटाच्या नव्या प्रदर्शनाची तारीख जवळ येईपर्यंत; देशभरातील बहुतांश राज्यांमधील सिनेमागृहं बंद झाली आहेत. म्हणूनच सिनेमांच्या निर्मात्यांनी दुहेरी खेळी खेळत सिनेमा ओटीटीवरदेखील प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असावा.' तसंच सलमानचा सिनेमा प्रदर्शित होतोय म्हटल्यावर इतर सिनेमांनी स्पर्धा नको; म्हणून माघार घेतल्याची देखील चर्चा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nZLQQ8